अवघ्या २० दिवसांच्या बाळाचा साडेसहा लाखांत सौदा! जालना ते रत्नागिरीपर्यंत विक्रीची साखळी; मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई

अवघ्या २० दिवसांच्या बाळाचा साडेसहा लाखांत सौदा! जालना ते रत्नागिरीपर्यंत विक्रीची साखळी; मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई

अवघ्या २० दिवसांच्या बाळाचा साडेसहा लाखांत सौदा! जालना ते रत्नागिरीपर्यंत विक्रीची साखळी; मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई

रत्नागिरी/ प्रतिनिधी

आईच्या कुशीतील मायेचा स्पर्शही धड अनुभवता न आलेल्या अवघ्या २० दिवसांच्या नवजात बाळाच्या आयुष्याचाच पैशांसाठी सौदा करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला अडीच लाख रुपयांना ठरलेला या चिमुकल्याच्या विक्रीचा व्यवहार मध्यस्थांच्या साखळीतून पुढे सरकत तब्बल साडेसहा लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. जालना ते रत्नागिरी असा बाळाला हलविण्याचा प्रकार सुरू असतानाच मुंब्रा पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या २४ तासांत या कथित बालविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. रत्नागिरीतून बाळाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. एका निष्पाप जीवाच्या आयुष्याला पैशांच्या तराजूत तोलणाऱ्या या प्रकाराने माणुसकीला काळिमा फासला आहे.

कळवा येथील शांतीनगर परिसरात राहणारी अनिसा रफीक शेख (१९) ही मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करते. तिच्या अवघ्या २० दिवसांच्या बाळाच्या विक्रीसाठी रेहान रिजवान शेख (२२) याने दबाव आणल्याचा आरोप आहे. तपासात या बाळाचा अडीच लाख रुपयांना सौदा ठरल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार उघडकीस येऊ नये, यासाठी फिर्यादीला १ लाख ९५ हजार रुपये देण्यात आल्याचेही समोर आले आहे. मात्र, त्यानंतर फिर्यादी आणि तिची बहीण अलकीशा यांना वायरने मारहाण करून ही रक्कम जबरदस्तीने काढून घेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. नवजात बाळाच्या विक्रीच्या कथित व्यवहारासोबतच महिलांवरील मारहाणीच्या या प्रकारामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

याप्रकरणी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी बाळाची तातडीने सुखरूप सुटका करून संबंधित आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी तपासासाठी पाच स्वतंत्र पथके तयार केली. महिला पोलीस निरीक्षक वृषाली पवार, पोलीस निरीक्षक शरद कुंभार, प्रशांत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक तेजस सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक राम दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही पथके वेगवेगळ्या दिशांनी तपासासाठी रवाना झाली. तपासाची सूत्रे हलताच बाळाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्याचे समोर आले. प्रत्येक टप्प्यावर मध्यस्थांचा सहभाग वाढत गेल्याने सुरुवातीला अडीच लाख रुपयांना ठरलेला व्यवहार तब्बल साडेसहा लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली. म्हणजेच, एका नवजात जीवाच्या विक्रीच्या कथित व्यवहारात मध्यस्थांची साखळी तयार होऊन पैशांचा आकडा वाढत गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ५ नोव्हेंबर रोजी ज्योती नरेश पाटील (३५), रेहान रिजवान शेख (२२), फरहान ऊर्फ फरौ रेहान शेख (२१), फरिदा अकबर सय्यद (५२) आणि हुरना ऊर्फ हुस्ना अल्ताफ शेख (२७) यांना अटक केली. त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी अनिता गोपीनाथ धोत्रे (४२), सुनीता प्रविण खैरनार (३०), गोपीनाथ किसन धोत्रे (४६), प्रतिमा प्रकाश परब (४६) आणि शिल्पा प्रदीप साठे (३४) यांना अटक करण्यात आली. गोपीनाथ धोत्रे याला पोलिसांच्या एका पथकाने जालना येथून ताब्यात घेतले, तर दुसऱ्या पथकाने रत्नागिरीपर्यंत धाव घेत बाळाचा शोध घेतला. अखेर या संयुक्त तपासमोहिमेत चिमुकल्याला सुखरूप ताब्यात घेण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनानुसार त्याला डोंबिवली येथील जननी आशीष संस्था येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. बाळाच्या पुढील संगोपनाबाबत बालकल्याण समितीच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाणार आहे. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या दहा आरोपींना १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) अशोक दुधे, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या कथित रॅकेटमागे आणखी कोणाचे हात आहेत, यापूर्वीही अशाच प्रकारे नवजात बालकांची विक्री करण्यात आली आहे का आणि या साखळीत आणखी किती मध्यस्थ सहभागी आहेत, याचा तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. अवघ्या २० दिवसांच्या बाळाला आईच्या कुशीपासून दूर करून पैशांच्या हव्यासापोटी वेगवेगळ्या ठिकाणी हलविण्यात आल्याच्या या घटनेने समाजमन हादरले आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने एका निष्पाप जीवाची सुखरूप सुटका झाली; मात्र नवजात बालकांच्या सुरक्षिततेचा आणि अशा कथित विक्री व्यवहारांमागील यंत्रणेचा प्रश्न या घटनेने पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

20 days baby sale, baby sale for 6.5 lakh, baby selling racket, baby trafficking Maharashtra, child sale racket, child trafficking case, infant trafficking, Jalna baby sale case, Maharashtra Breaking News, Maharashtra crime news, Marathi crime news, Mumbra police, Mumbra police action, newborn baby sold, newborn baby trafficking, Ratnagiri baby sale case, Right Angle Marathi, Thane crime news

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत