संकेत पाटील, सांगली
सांगली जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असून बारमाही वाहणारी कृष्णा नदीही कोरडी पडली आहे. त्यामुळे कृष्णा नदीवर अवलंबून असलेल्या गावखेड्यांना पाणीटंचाईची झळ बसत आहे.
सांगली जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत माजी खासदार संजय पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच पाणी प्रश्नावर संजय पाटील यांनी वारणाली येथील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला होता.
मात्र, त्यानंतरही सांगली जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत संजय पाटील यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांची बाजू लावून धरली. तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून सांगलीचे पाणी अडवले असा खडा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला.
पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना आवश्यक पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी बैठकीत केली. त्यामुळे सांगलीच्या पाणी प्रश्नावर प्रशासन आणि जलसंपदा विभाग आता कोणती भूमिका घेतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा