सुरक्षित बालपण, सक्षम बालिका! अंजनगाव बारीत १५० विद्यार्थिनींना बालहक्क व बालसंरक्षणाचे धडे

सुरक्षित बालपण, सक्षम बालिका! अंजनगाव बारीत १५० विद्यार्थिनींना बालहक्क व बालसंरक्षणाचे धडे

जिल्हा महिला व बाल विकास विभाग आणि ‘जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रेन’ प्रकल्पांतर्गत अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्थेच्या जिल्हा समन्वयक ॲड. अभिता वासनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या गायत्री घोगरे यांनी विद्यार्थिनी, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी ॲड. वासनिक यांनी बालहक्क व बालसंरक्षणाविषयी जनजागृती करणारे बॅनर आणि पत्रकेही तयार केली होती.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापिका विजया झाडे यांनी प्रास्ताविकात भारतीय राज्यघटनेने दिलेले हक्क व कर्तव्ये, मुलांची काळजी घेण्याची पालकांची जबाबदारी आणि मुलांनी स्वतःच्या संरक्षणासाठी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली.

गुड टच-बॅड टच, स्वच्छता आणि कायदेशीर मदतीविषयी मार्गदर्शन

प्रमुख मार्गदर्शिका ॲड. अभिता वासनिक यांनी विद्यार्थिनींशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधत बाललैंगिक शोषणापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, योग्य आणि अयोग्य स्पर्शातील फरक कसा ओळखावा, अशा प्रसंगी विश्वासू व्यक्तीची मदत कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वैयक्तिक स्वच्छता, मुलींची सुरक्षितता, बालमजुरी आणि बालविवाह यांसारख्या समस्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला. अनुचित घटना घडल्यास घाबरून न जाता कायदेशीर मदत कशी मिळवावी, याची माहितीही त्यांनी दिली.

सामाजिक कार्यकर्त्या गायत्री घोगरे यांनी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ आणि आपत्कालीन मदत क्रमांक ११२ यांचे महत्त्व समजावून सांगितले. रस्ते सुरक्षा, अनोळखी व्यक्तींपासून सावध राहणे आणि वैयक्तिक गोपनीयतेचे संरक्षण याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत बालविवाह, बालतस्करी, बालकामगार, बाललैंगिक शोषण, ऑनलाइन छळ आणि सायबर बुलिंग या विषयांवर जनजागृती करण्यात आली. मुलांना आमिष दाखवून फसवण्याचा प्रयत्न झाल्यास सतर्क कसे राहावे, मदतीसाठी कसे ओरडावे आणि सुरक्षित ठिकाणी कसे जावे, याबाबतही माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थितांना बालविवाह प्रतिबंधाची शपथ देण्यात आली.

शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग

या कार्यशाळेला जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील विद्यार्थिनी, त्यांच्या माता व पालक तसेच शिक्षक उपस्थित होते. शिक्षक रामेश्वर स्वर्गीय, किशोर मालोकार, संगीता मंडे आणि रेश्मा वांगे यांच्यासह जिल्हा परिषद उर्दू पूर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अजहर सर, शिक्षिका आयेशा व नगमा तसेच अन्य शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. कन्या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्नेहा पोकळे यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन रामेश्वर स्वर्गीय यांनी केले. प्रार्थनेने कार्यशाळेची सांगता झाली.

बालहक्क, सुरक्षितता आणि संरक्षणाविषयी विद्यार्थिनींसह पालक व शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली.

150 Students, Anjangaon Bari, Anjangaon Bari News, Child Labour Awareness, Child Marriage Awareness, Child Protection, Child Protection Awareness, Child Rights, Child Rights Awareness, Child Safety, Education, Empowered Girls, Girl Child, Girls Education, Ground Report, Maharashtra News, Right Angle Marathi, Rural Education, Safe Childhood, School Awareness Program

Updated: 29 Oct 2026 2:07 PM

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत