पुन्हा कधी उजाडेल का हो बेऱ्याचा दिवस?

दसऱ्याला आप्पा हत्यारं स्वच्छ करायचे. गिरमिट, रंधा, तासणी, पटाशी, करवत, निसणा ओळीने मांडून ठेवायचे. एका-एका हत्याराला इबीत बुकका लावायचे. प्रत्येकावर एक एक फुल ठेवायचे. “ही हत्यार हायत म्हणून आपण आहोत; त्यांच्यामुळंच शेतीच हे चकार फिरतंय. त्यांच्यामुळच माझा वटा कधी रिकामा राहात न्हाय”. असं म्हणून त्यांच्यापुढं नतमस्तक व्हायचे.

पुन्हा कधी उजाडेल का हो बेऱ्याचा दिवस?

शेतकऱ्याच कुरी बनवण्याच काम आल की आप्पा त्या कामात मग्न असायचे. पटाशी, गिरमिट, रंधा, तासणी अशी हत्यारं ओबडधोबड लाकडावर चालू लागायची. आप्पा घामाने भिजायचे. त्यांच्या तोंडातून कष्टाचा आवाज निघायचा. त्यांच्या घामाचे थेंब त्या लाकडावर पडायचे. हळूहळू ओबड धोबड लाकडाला कुरीचा आकार येऊ लागायचा. कुरी तयार झाली की आप्पा खुश असायचे. त्यांची लगबग सुरू व्हायची. ते शेतकऱ्याला निरोप द्यायचे. मग बेऱ्याचा दिवस उजडायचा. त्या दिवशी घरातील भावंड खूश असायची. शेतकरी पाटीतून धान्य, हळदी कुंकू, गुळाचा खडा घेऊन यायचा. ताडपदरी अंथरूण आप्पा त्यावर नवी कुरी ठेवायचे. पाटीतून आणलेले धान्य कुरीच्या चाड्यात टाकायचे. नळीतून धान्य व्यवस्थित पडतंय का ? धान्य कुठे अडकत नाही ना? हे तपासलं जायच. शेतकरी हळदी कुंकू लावून नवी कुरी पुजायचा. तिथे गूळाचा खडा ठेवायचे. कुरीतून बेरं तपासण्यासाठी टाकलेलं पाटीभर धान्य आम्हाला मिळायचं. तिथे ठेवलेल्या गुळाच्या खड्यावर पोरं झडप घालायची.
पेरणीच्या दिवसात आप्पा शिवारातून फिरायचे. पेरणी सुरू असताना कुणाचं औत तुटलाय का? यावर लक्ष ठेवायचे. ऐन पेरणीत घोटाळा होऊ नये म्हणून उन्हातान्हात रानोमाळ हिंडायचे. पेरणीच्या वेळी शेतकरी शेंगदाण्यासारखे बियाणे पोरांना देखील खायला द्यायचा नाही. एका बियातून ओंजळभर बी मिळणार असते. पण पेरणीच्या वेळी सुतार शेतात आला की कुळवाडी पेरणीच्या मिसळलेल्या धान्याची ओंजळ आप्पांच्या खांद्यावरील वटीत मोकळी करायचा. आप्पा जातील तिथून अस धान्य घेऊन यायचे. आप्पानी आयुष्यभर शेतकऱ्यांची सेवा केली. सगळ्या शेतकऱ्यांची नड काढली. त्यांना बैलगाडीचा बैलांचा मोठा नाद होता. वय झाल्यावर होत नव्हतं म्हणून मामानी बैल विकायला काढला. आप्पानी बैल विकायला नकार दिला. ते रुसून बसले. आजारी पडले. हरणी नावाची एक गाय होती. तिच्यावर आप्पांचा जीव होता. आप्पाना शेवटी वेगात चालायच व्हायच नाही. हरणीला हे माहीत होतं. ती हळूहळू चरायची. आप्पांना दमवायची नाही.

आम्ही आजोळला गेलो की दुधाच्या पातेल्याची साय पुसून खाण्यासाठी आम्हा बहीण भावांची भांडणं व्हायची. आप्पा हे बघायचे. त्यांनी आईला एक रेडी दिली. पण तिच दाव माग फिरवण्याचा शब्द घेऊन व्यवहार शिकवला. त्या एका रेडीपासून सहा सात म्हैशी झाल्या. घरात दूध दुभत झालं. जनावरांमुळे पडीक शेती हाताखाली आली. कुटुंबाला आर्थिक हातभार लागला. आईनं ठरल्याप्रमाणे एक रेडीच दाव माग फिरवलं. 

आज दसऱ्याला आप्पानी ओळीनं मांडून ठेवलेली, बुक्का लाऊन त्यावर झेंडूची फुल ठेवलेली हत्यार जशीच्या तशी डोळ्यांसमोर येतायत. आजच्या यंत्रयुगात आप्पांनी केलेल्या या सेवेची आठवण कोण ठेवेल का? पुन्हा कधी बेऱ्याचा दिवस उजाडेल का हो??
-सागर गोतपागर

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत