वाढत्या तापमानवाढीच्या संकटात वन्यजीवांसाठी ‘वनतलाव’ वरदान; रोह्याचे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्याकडून सामूहिक वनव्यवस्थापन समिती, नेरे नानोसे, ‘वातावरण’ आणि ‘बजाज’ फाउंडेशनचे कौतुक..!
प्रशासन आणि जनतेच्या समन्वयातून जल व वन संवर्धनाचे कौतुकास्पद पाऊल!
सामूहिक वनव्यवस्थापन समिती, नेरे नानोसे व वनविभाग यांच्या समन्वयातून जल-वन संवर्धन मोहिमेस सुरुवात.!
एकाबाजूला जगभरात एल-निनोमुळे तापमानवाढ व तीव्र दुष्काळ, जंगलांना वणवे लागण्याची वाढती शक्यता, जैवविविधतेचा ऱ्हास असे भीषण दुर्भिक्ष येऊन ठेपले असताना दुसऱ्या बाजूला सामूहिक वनव्यवस्थापन समिती, नेरे नानोसे, वन विभाग, एकात्मिक आदिवासी विकास विभाग, पंचायत समिती, सुधागड पाली, वातावरण फाउंडेशन आणि बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन यांच्या समन्वयातून वन्यजीव व जैवविविधता टिकवण्यासाठी वनतलाव खोदण्याचा घेतलेला कृतिशील निर्णय कौतुकास्पद आहे. – ~मा. ज्ञानेश्वर खुटवड, प्रांताधिकारी, रोहा, रायगड

नेरे नानोसे, सुधागड (जि. रायगड), २३ ऑक्टोबर २०२६:
“आज जगभरात एल-निनोचे संकट घोंगावत आहे. यामुळे प्रचंड तापमानवाढ होणार असून, त्याचा थेट दुष्परिणाम अन्नसाखळीवर होईल आणि पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण होणार आहे. अशा बिकट परिस्थितीत माणूस काहीही करून स्वतःसाठी मार्ग काढू शकतो, परंतु मूक वन्यजीव आणि जैवविविधता यातून कसा मार्ग काढणार? हा आपल्यासमोरील खरा प्रश्न आहे., नेरे नानोसेच्या सामूहिक वनव्यवस्थापन समितीने वन्यजीव व जैवविविधता जोपासण्यासाठी आपल्या सामूहिक वनहक्क मान्यता क्षेत्रात वनतलाव खोदण्याचे जे काम हाती घेतले आहे, ते अत्यंत कौतुकास्पद आणि दिशादर्शक आहे,” असे प्रतिपादन रोह्याचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) मा. ज्ञानेश्वर खुटवड यांनी केले.
शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता सामूहिक वनहक्क मान्यता प्राप्त वनक्षेत्र, कंपार्टमेंट क्र. ६५९ येथे आयोजित वनतलावाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. खड्ड्याच्या प्रतीकात्मक खोदकामाने या संबंधित वनक्षेत्रामधे स्थानिक आदिम आदिवासी लोकसमुदायाच्या नेतृत्वात जल-जंगल संवर्धन मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
“बजाज इलेक्ट्रिकल्स फाउंडेशनने या वैधानिक कामासाठी केलेले आर्थिक सहकार्य अतिशय महत्त्वाचे आहे. वातावरण फाउंडेशनद्वारे सातत्याने स्थानिक आदिवासी समुदाय व स्थानिक प्रशासन यांच्या सोबत सुरू असणाऱ्या सातत्यपूर्ण समन्वयाचे अभिनंदन करतो. आदिवासी समुदाय आणि वन विभाग यांच्यातील एकीची सांगड ही निसर्गरक्षणासाठी प्रेरणादायी व महत्वाची असल्याचे अधोरेखित करून सर्वच विभागांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या “जल व वन संवर्धन मोहिमेला” पूर्ण सहकार्य करावे, असे निर्देश मा. प्रांताधिकारी यांनी दिले.

बजाज इलेक्ट्रिकल्स फाउंडेशनच्या सहकार्याने वातावरण फाउंडेशनद्वारे आपटवणे, असनेवाडी आणि नेरे नानोसे या तीन गावांमध्ये अशा प्रकारे वनतलाव उभारले जाणार आहेत. प्रत्येक गावातील १० कुटुंबांना तब्बल ९० दिवसांचा थेट रोजगार मिळणार आहे. यामुळे उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे होणारे ग्रामीण स्थलांतर थांबण्यास मदत होईल आणि वनसंरक्षणासाठी सक्षम स्थानिक मनुष्यबळ उभे राहणार असल्याचे मत मा. भगवान केसभट, संस्थापक व संचालक, वातावरण फाउंडेशन यांनी मांडले.
बजाज इलेक्ट्रिकल्स फाउंडेशनच्या CSR प्रमुख मा. श्रेया सुधीर यांनी म्हटले की, जंगलांचे व जैवविविधतेचे रक्षण ही काळाची गरज आहे. तापमानवाढीच्या धोक्यात अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी सामूहिक वनव्यवस्थापन समिती, वन विभाग आणि वातावरण फाउंडेशन यांचा समन्वय प्रशंसनीय आहे. त्यांनी नेरे नानोसेसह आपटवणे व इतर गावांमध्येही असेच वनतलाव खोदण्यात येणार असल्याचे आणि सुधागड तालुक्यातील एकूण १५ गावांमध्ये १०० सोलर स्ट्रीट लाइट्स बसवण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
वातावरण फाउंडेशनचे सीईओ श्री. भगवान केसभट म्हणाले, “आदिम आदिवासी समुदायांच्या वनसंवर्धन मोहिमेसाठी कॉर्पोरेट क्षेत्राची आर्थिक साथ लाभणे ही महत्त्वाची बाब आहे. शहरी भागातील सुशिक्षित मंडळींनी ग्रामीण भागातील जंगलांकडे दुर्लक्ष केलेले नाही, हे बजाज इलेक्ट्रिकल्स फाउंडेशनच्या सहकार्यातून अधोरेखित होते.”
CFRMC अध्यक्षा सुश्री वनिता खरात यांनी सांगितले की, लागवड झालेल्या रोपांची निगा राखणे, नियमित पाणीपुरवठा करणे, आळे तयार करणे आणि वन्यजीवांसाठी पाणीसाठा उपलब्ध करून देणे या जबाबदाऱ्या समितीने घेतल्या आहेत. खजिनदार श्री. सुरेश जाधव यांनी वनतलाव खोदण्यामुळे वन्यजीवांना पाणी उपलब्ध होणारच आहे, शिवाय वाडीतील १० कुटुंबांना स्थानिक रोजगार मिळणार असल्याने विशेषतः महिला मोहिमेत सहभागी होतील, असे सांगितले.

गटविकास अधिकारी मा. लता मोहिते यांनी सामूहिक वनव्यवस्थापन समितीची गेल्या काही वर्षांपासूनची सातत्यपूर्ण कृती सर्वांसाठी आदर्श असल्याचे मत व्यक्त केले. तर ITDP पेणचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मा. प्रदीप सोलसकर यांनी बजाज इलेक्ट्रिकल्स फाउंडेशनचे सहकार्य वनावलंबी समुदायाला स्थलांतर-मुक्त करण्यास मदत करेल, असे सांगितले.
प्रशासन, स्थानिक समुदाय, वातावरण फाउंडेशन आणि बजाज इलेक्ट्रिकल्स फाउंडेशन यांच्यातील समन्वय निसर्गाच्या रक्षणासाठी काय चमत्कार करू शकतो, हेच या निमित्ताने समाजासमोर आले आहे. ही भागीदारी जल-वन सुरक्षा बळकट करण्यासोबतच आदिवासी व उदरनिर्वाहासाठी वाणांवर अवलंबून असणाऱ्या समुदायांची नाळ पुन्हा वनसंरक्षणासाठी जुळली जाणार आहे असे प्रतिपादन मा. गुलचंद काकडे, वनरक्षक, सुधागड पाली यांनी केले.
शेवटी स्थानिक प्रशासन, मा. प्रांताधिकारी मा. गटविकास अधिकारी, मा. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, मा. वनविगाचे अधिकारी, कर्मचारी व सामूहिक वन व्यवस्थापन समिती यांचे सहकार्याबद्दल केसभट यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
अधिक माहितीसाठी संपर्क:
अंकुश लोणकर : ७०५७१ ४२१२७
शिवाजी हिरडे : ८७९३६ ३७३५३
राहुल सावंत : ९९३०७ ४९८७५

प्रतिक्रिया व्यक्त करा