तासगाव तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोसायटी गटाच्या निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील यांनी माजी आमदार सुमन पाटील यांचा दोन मतांनी पराभव केला. संजय पाटील यांना ४० मते, तर सुमन पाटील यांना ३८ मते मिळाली. एक मत बाद झाले.
या निकालामुळे तासगावच्या राजकारणात संजय पाटील गटाला महत्त्वाचे यश मिळाले आहे. सुमन पाटील या आमदार रोहित पाटील यांच्या मातोश्री असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले होते.
तासगाव तालुक्यात एकूण ८० विकास सोसायट्या आहेत. त्यापैकी एका सोसायटीमध्ये मतदानाचा ठराव न झाल्याने ७९ सोसायट्यांमधून मतदान झाले. तालुक्यातील अनेक विकास सोसायट्यांवर रोहित पाटील गटाचे वर्चस्व असल्याचे मानले जात असतानाही संजय पाटील यांनी दोन मतांनी विजय मिळवला.
जिल्हा बँकेच्या या निवडणुकीसाठी दोन्ही गटांनी मोठी तयारी केली होती. मतदानाच्या आधी मतदारांच्या संपर्कासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न करण्यात आले. निकालानंतर तिसऱ्या आघाडीतील काही मतदारांनी संजय पाटील यांना साथ दिल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, मागील काही स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे पाहिले जात आहे. तासगाव नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही संजय पाटील गटाला यश मिळाले आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यातील राजकीय समीकरणांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांनी संजय पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संजय पाटील यांनी सुमन पाटील यांचा पराभव केला आहे. अवघ्या दोन मतांच्या फरकाने झालेल्या या निकालामुळे तासगावच्या राजकारणात या निवडणुकीची चर्चा रंगली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा