– मोशीतील छत्रपती संभाजी महाराज स्मारक वाढीव निविदेवरून नगरसेवकांचा संताप ; महापालिका भवनासमोर आंदोलन
पिंपरी ! राईट अँगल
मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या वाढीव कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत संबंधित ठेका तात्काळ रद्द करण्याची मागणी पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवकांनी केली आहे. वाढीव व चुकीच्या दराने दिलेल्या निविदेविरोधात नगरसेवकांनी महापालिका भवनासमोर जोरदार आंदोलन छेडले. हा ठेका रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरू असा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे.
या आंदोलनात नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, संदीप वाघेरे, सुलभा उबाळे, विश्वजीत बारणे आदी सहभागी झाले होते. स्मारकाच्या कामात पारदर्शकता नसून निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत “धनेश्वर ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का? महापालिका एवढी मेहेरबान का?” असा परखड सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले की, महापुरुषांविषयी संवेदनशीलता असणे आवश्यक आहे. मात्र निविदा प्रक्रियेत किती भ्रष्टाचार करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. “पुतळा आणि स्मारक सुशोभित करा, पण एक रुपयाची वस्तू हजार रुपयांना करणे योग्य आहे का? छत्रपती संभाजी महाराज अशा प्रकारचा भ्रष्टाचार माफ करतील का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नगरसेविका सुलभा उबाळे यांनी पूर्वीच्या कामांचा उल्लेख करत सांगितले की, सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवून जागा बदलल्यामुळे सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च पाण्यात गेला. त्यावेळी ५ कोटींची निविदा थेट देण्यात आली होती.“जुन्या आणि नव्या ठिकाणी एकच ठेकेदार कसा? त्याला वाढीव दराने आणि बिलो टेंडर देण्याचा उद्देश काय आहे. धनेश्वर ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का?” असा सवाल त्यांनी पुन्हा उपस्थित केला.
नगरसेवक नाना काटे यांनी सांगितले की, महाराजांच्या नावाने होणाऱ्या स्मारकाची निविदा फुगवून भ्रष्टाचार झाला आहे. सर्वांनी विरोध करूनही ही निविदा मंजूर करण्यात आली. “ही निविदा रद्द न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू,” असा इशाराही त्यांनी दिला.
नगरसेवक संदीप वाघेरे यांनीही तीव्र शब्दांत निषेध नोंदवत सांगितले की, देव, देश आणि धर्मासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने होणाऱ्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचे पाहून संताप येतो. “अधिकाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. मग वाढीव निधी देऊन ही उधळपट्टी कशासाठी? बोगस ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने चुकीची कामे केली जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, संबंधित ठेका तात्काळ रद्द करून संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
————–
बातमीसाठी संपर्क : 7350266967
