धक्कादायक! चिपळूणमध्ये सत्य मांडणाऱ्या पत्रकारावर हल्ला

रत्नागिरी/प्रतिनिधी

चिपळूणमधील नागरी सहकारी पतसंस्थेच्या कारभाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी दीपक भागवत घटनास्थळी पोहोचले होते. तेथे सुरू असलेल्या आंदोलनाचे दृश्य टिपत असताना पतसंस्थेच्या समर्थकांकडून शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या झटापटीच्या दरम्यान पत्रकार भागवत यांनी त्यांचे पैशाचे पाकीट , मोबाईल लंपास केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या हल्ल्यात भागवत यांच्या डोक्याला व शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण केले असून, हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये काही जण पत्रकारावर तुटून पडताना स्पष्ट दिसत असल्याने नागरिकांमधूनही तीव्र संताप देखील व्यक्त होत आहे.

पत्रकारावर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवरील अत्याचार नसून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर उघडपणे चालवलेला दबाव मानला जात आहे. “ माजलेले हल्लेखोर कोणत्याही पक्षाचे असोत, माजलेल्या हल्लेखोरांना तात्काळ अटक झाली पाहिजे,” अशी मागणी करण्यात येत आहे. पत्रकार हा घटनास्थळी स्वतःचे वैयक्तिक नव्हे तर सार्वजनिक कर्तव्य बजावत असतो. आंदोलन, वाद, गैरव्यवहार किंवा लोकक्षोभ यांचे वास्तव समाजासमोर आणणे ही त्याची जबाबदारी असते. पत्रकार दीपक भागवत यांनी यापूर्वी अनेक संवेदनशील विषयांवर निर्भीडपणे भूमिका घेत वार्तांकन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा रोष नसून सत्य बाहेर येऊ नये, अशी मानसिकता दर्शवणारा प्रकार मानला जात आहे. पत्रकारितेवर हात उचलणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कलमांखाली कारवाई झाली नाही, तर अशा प्रवृत्ती अधिक बळावतील, अशी भीती देखील आता व्यक्त होत आहे.

वार्तांकन रोखण्यासाठी थेट मारहाणीचा मार्ग स्वीकारला जाणे म्हणजे लोकशाही मूल्यांनाच उघड आव्हान मानले जात आहे. कायद्याच्या राज्यात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवरच हल्ले होत असतील, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. कायद्याचा धाक संपल्याप्रमाणे वागणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा माज पोलिसांनी तातडीने उतरवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *