रावेत परिसरात दोन दिवस वीज पुरवठा विस्कळीत 

बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे केलेल्या खोदकामात उच्च दाब वाहिनी तुटल्याचा फटका 

पिंपरी । प्रदीप लोखंडे

चिंचवड एक्स्टेन्शन परिसरातून रावेत, विकास नगर आणि किवळे या भागांना विद्युत पुरवठा करणारी उच्च दाब विद्युत वाहिनी म्हस्के वस्ती येथे सुरू असलेल्या खोदकामादरम्यान तुटल्याने मंगळवार (दि. २४) आणि बुधवार (२५) असे सलग दोन दिवस वीजपुरवठा खंडित झाला. या अचानक झालेल्या बिघाडामुळे हजारो नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून, विशेषतः सध्या सुरू असलेल्या शाळा व स्पर्धा परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहे.

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी पाणीपुरवठाही विस्कळीत झाला. विजेअभावी मोटारी बंद राहिल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली. महिलांवर आणि ज्येष्ठ नागरिकांवर याचा विशेष परिणाम जाणवला.

दरम्यान, या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. योग्य नियोजन आणि महावितरणची पूर्वपरवानगी घेऊन खोदकाम केले असते तर ही समस्या आली नसती असे मत लोकप्रतिनिधी व्यक्त करत आहेत.

महावितरणकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, तांत्रिक पथके युद्धपातळीवर काम करत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, नागरिकांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची मागणी केली आहे. तसेच, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अखंड वीज व पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
———-
प्रति

रावेत, किवळे, यासह माझ्या प्रभागात विज पुरवठा खंडित झाल्याच्या अनेक तक्रारी करणारे नागरिकांचे फोन येत होते. मी अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर वीज पुरवठा करणारी वाहिनी तुटल्याचे सांगण्यात आले. देखभाल दुरुस्ती करणे अथवा नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

राजेंद्र तरस, युवा सेना प्रमुख, मावळ लोकसभा.
————-


“चिंचवड एक्स्टेन्शन येथून रावेत, विकास नगर आणि किवळे या भागांना विद्युत पुरवठा करणारी उच्च दाब विद्युत वाहिनी म्हस्के वस्ती येथे बिल्डरकडून सुरू असलेल्या खोदकामादरम्यान उचकटून निघाल्याने मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. सध्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सुरळीत आणि पूर्णवेळ वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. संबंधित बांधकाम व्यावसायिकावर दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत ठोस कारणांचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल.”

किरण सरोदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण, निगडी कार्यालय
————————————

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल

संपर्क क्रमांक : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *