ड्रग्ज-धंदे थांबवा, नाहीतर…आ. रोहित पाटील आक्रमक.
संकेत पाटील /तासगाव
सांगली जिल्ह्यात अवैध धंदे, अमली पदार्थांची खुलेआम विक्री आणि वाढती गुन्हेगारी यामुळे संपूर्ण जिल्हा गुन्हेगारांच्या ताब्यात गेल्याची भीती व्यक्त करत तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी सांगली पोलिस प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून आलेले भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण ठोकरून त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे — जोपर्यंत अवैध धंदे आणि ड्रग्जची विक्री पूर्णपणे थांबत नाही आणि दोषींवर कठोर दृश्यमान कारवाई होत नाही, तोपर्यंत पोलिसांच्या कोणत्याही कार्यक्रमात मी एकही पाऊल टाकणार नाही!

आमदार रोहित पाटील यांनी सांगितले, “अमली पदार्थांनी तरुणाई बरबाद होत आहे, गावोगावी अवैध धंदे फोफावत आहेत, चोरी-मारामाऱ्या आणि दहशतवादाने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. तरीही पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. हे नेमके काय चाललंय? काही पोलीस कर्मचारीच या अवैध धंद्यांना पाठबळ देत असल्याच्या गंभीर चर्चा आहेत. जनतेचे रक्षण करणारेच जर गुन्हेगारांचे साथीदार बनत असतील, तर न्याय कुठे मागायचा?”
नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आमदार रोहित पाटील यांनी विधिमंडळात सांगली जिल्ह्यातील अवैध धंदे आणि अमली पदार्थांच्या मुद्द्यावर गृह विभागाचे वाभाडे काढले होते. अधिवेशन संपल्यानंतरही त्यांची भूमिका अधिक आक्रमक झाली आहे. पोलिसांच्या निमंत्रणाला नकार देत त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.
आमदार रोहित पाटील यांचा स्पष्ट इशारा :
“ठोस कारवाईशिवाय एकही पाऊल मागे नाही. अवैध धंदे आणि ड्रग्ज विक्री बंद होईपर्यंत पोलिसांच्या कोणत्याही कार्यक्रमाला आमचा बहिष्कार कायम राहील.”
या आक्रमक आणि निर्भीड भूमिकेमुळे सांगली जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये समाधान व्यक्त होत असून, अवैध धंदे चालवणाऱ्या आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जनतेचा सवाल :
पोलिस प्रशासन आता खडबडून जागे होणार की, जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आणखी मोकळे रान देणार?
आमदार रोहित पाटील यांची ही ठाम आणि आक्रमक भूमिका सांगली जिल्ह्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे का? हे येणाऱ्या काळात कळेल.
