पिंपरी । प्रदीप लोखंडे
हिंजवडी परिसरात कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने ५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी अद्याप अटकेत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी अनिकेत संजीव कुमार अग्रवाल यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिपक कोंडीबा फडके (रा. कानगाव, ता. दौड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२६ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत हिंजवडी (ता. मुळशी, जि. पुणे) येथील हिंजवडी चौक परिसरात ही घटना घडली. आरोपीने फिर्यादीस बांधकाम व्यवसायासाठी ४ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी विश्वास संपादन करत बाणेर येथील फ्लॅट तारण ठेवण्याच्या कारणावरून करारनामा करून घेतला.
या प्रक्रियेदरम्यान आरोपीने करारनाम्याची मूळ प्रत तसेच ‘आगाऊ सुरक्षा ठेव’ म्हणून ५ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर ना कर्ज मिळवून दिले, ना घेतलेली रक्कम परत केली. यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार फिर्यादीने दिली आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताकतोडे करत आहेत.
————————-
प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल
संपर्क क्रमांक : 7350266967
