आरफळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!

२०२६ च्या दराने मिळणार भरघोस भूसंपादन मोबदला

आमदार रोहित पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने १७ वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी; ड्रोन सर्वेक्षणानंतर लवकरच खात्यात येणार रक्कम

संकेत पाटील /तासगाव

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत प्रशासनाने स्पष्ट केले की, या महिन्याअखेर ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करून भूसंपादनाची अचूक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर तातडीने मोबदला वाटपाची प्रक्रिया सुरू होईल.

२००९ पासून प्रलंबित असलेला हा प्रश्न गतवर्षी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार रोहित पाटील यांनी लक्षवेधी मांडून प्रभावीपणे उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनी प्रशासनासोबत सतत पाठपुरावा करत हा विषय प्राधान्याने निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. याच सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणून आता शेतकऱ्यांना न्याय्य आणि सुधारित दराने मोबदला मिळणार आहे.

बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर रक्कम वर्ग करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे दीर्घकाळ अन्याय सहन करणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकरी म्हणतात…
“आमदार रोहित पाटील यांनी आमच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले. १७ वर्षांनंतर आता आम्हाला योग्य मोबदला मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे,” अशी भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *