- उद्योजकांच्या महापालिका आयुक्तांकडे तक्रारींचा पाढा
- फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनसोबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सोबत बैठक
पिंपरी । राईट अँगल
एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या विविध मूलभूत समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन माननीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.
या बैठकीत अध्यक्ष अभय भोर यांनी उद्योजकांच्या अडचणी मांडताना एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, सांडपाणी व ड्रेनेज समस्या, अपुरी स्वच्छता, महिला कामगारांसाठी स्वच्छतागृहांची कमतरता, अपुरी स्ट्रीट लाईट व्यवस्था, सुरक्षा प्रश्न आणि सार्वजनिक वाहतुकीचा अभाव या गंभीर मुद्द्यांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. यासंदर्भात उद्योजकांच्या वतीने सविस्तर निवेदनही सादर करण्यात आले.
उद्योजकांच्या समस्यांवर सातत्याने पाठपुरावा व्हावा यासाठी दर महिन्याला बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच बंद पडलेला गाळा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. एमआयडीसी परिसरातील पर्यावरण संस्कार उद्यानाकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबतही चिंता व्यक्त करत त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकसह आवश्यक सुविधा विकसित करण्याची मागणी करण्यात आली.
महिला उद्योजक संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी महिला कामगारांसाठी स्वच्छतागृहांचा प्रश्न उपस्थित करत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच एमआयडीसी परिसरात अंतर्गत बस सेवा सुरू करण्याबाबतही त्यांनी आग्रह धरला. या दोन्ही मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले.
यावेळी उपाध्यक्ष वैभव जगताप, जयश्री साळुंखे, रेश्मा मुल्ला, नारायण मगर, स्वाती मगर, शिवाजीराव पाटील, विशाल पठारे, समिती सदस्य आणि अन्य उद्योजक उपस्थित होते. एमआयडीसी परिसरात हजारो उद्योजक व लाखो कामगार कार्यरत असून, मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्यांच्या कामकाजावर आणि सुरक्षिततेवर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
दरम्यान, आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी लवकरच एमआयडीसी परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन समस्यांची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे स्पष्ट केले. या बैठकीमुळे प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले गेल्याची भावना उद्योजकांनी व्यक्त केली असून, परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
———————-
प्रदीप लोखंडे, संपादक राईट अँगल
