पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; सायबर गुन्हेगार टोळीवर पहिल्यांदाच मकोका

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक; नऊ आरोपींवर कठोर कारवाई

पिंपरी । प्रदीप लोखंडे 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सायबर गुन्ह्यांविरोधात मोठी कारवाई करत संघटित टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०२६ मध्ये ही कारवाई करण्यात आली असून सायबर गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई ठरली आहे.

सायबर पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारी २०२६ रोजी एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, बनावट ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून तब्बल ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. यापैकी गोठवण्यात आलेली २ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीला परत मिळणार आहे.

तपासादरम्यान कोल्हापूर, पुणे, मुंबई (दहिसर), औरंगाबाद आणि उदयपूर (राजस्थान) येथून या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अभय बाबासाहेब पाटील, शिवतेज राजेंद्र पोटे, युवराज उर्फ संतोष सतीश मुदलीयार, रॉनी उर्फ पंकज मंगु गिरीगोस्वामी, प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी, उमेश लक्ष्मीलाल भट्ट, महेश करबसप्पा उडचणे, राहुल बहारदुरप्रसाद मौर्य आणि शेख अब्दुल रहिस शेख अब्दुल रशीद यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींविरोधात यापूर्वीही एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

आरोपींनी संघटित टोळी तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केली. तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी संपर्क ठेवून फसवणुकीची रक्कम यूएसडीटी (क्रिप्टोकरन्सी) स्वरूपात वर्ग करण्यात येत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. या टोळीने पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि मध्य प्रदेशातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत कलम ३(१)(ii) व ३(४) लागू करण्याचे आदेश दिले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, प्रकाश कातकडे तसेच अंमलदार दिपक भोसले, हेमंत खरात, सुभाष पाटील, विनायक म्हसकर, अतुल लोखंडे, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, महेश मोटकर, प्रविण शेळकंदे, सोपान बोधवड, सुरज शिंदे, दिपक माने, स्वप्नील खनसे, शिवाजी बनसोडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

————————————

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल 

संपर्क क्रमांक : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *