राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब
राईट अँगल । प्रदीप लोखंडे
विधानपरिषदेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराला पुन्हा एकदा डावलले आहे. शहरातील अनेक इच्छुकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नेतृत्वाला संधी द्यावी, अशी मागणी सातत्याने लावून धरली होती. मात्र पक्षाने शहराबाहेरील चेहऱ्याला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी दिवंगत जेष्ठ नेते बाबा सिद्धिकी यांचे सुपुत्र माजी आमदार झिशान सिद्धिकी यांना उमेदवारी दिली आहे.
शहरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत शहराध्यक्ष योगेश बहल यांना विधानपरिषदेसाठी संधी द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली होती. योगेश बहल हे सहा पेक्षा अधिक वेळा निवडून आलेले अनुभवी नेते आहेत. तसेच शहरात अनेक नगरसेवक निवडून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना संधी देणे योग्य ठरेल, असा युक्तिवाद करण्यात आला होता.
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या राष्ट्रवादीचा केवळ एकच आमदार आहे. शहराचा वाढता विस्तार आणि राजकीय महत्त्व लक्षात घेता आणखी एक प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र पक्षाकडून या मागणीचा गांभीर्याने विचार झाल्याचे दिसत नाही.
विधानपरिषदेसाठी योगेश बहल यांच्यासह इतर अनेक जेष्ठ नेत्यांना संधी मिळावी अशी मागणी समर्थक करत होते. विशेषतः योगेश बहल यांनी समर्थकांसह पक्षश्रेष्ठींना भेट देऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र ही भेट निष्फळ ठरल्याचे समोर येत आहे.
यामुळे स्थानिक पातळीवर नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी हा निर्णय पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतो, अशीही चर्चा सुरू आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून शहराबाहेरील चेहऱ्याला प्राधान्य दिल्यास त्याचा परिणाम संघटनात्मक पातळीवर होऊ शकतो, अशी देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.
—————————————
प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल
संपर्क : 7350266967
