472 लाभार्थ्यांकडून पीएमआरडीच्या सदनिका रद्दची प्रक्रिया
पिंपरी । प्रदीप लोखंडे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून काढण्यात आलेल्या सदनिकांसाठी आता प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसाठी संधी निर्माण झाली आहे. प्रारंभी एक हजार २९ सदनिकांसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात ८७१ सदनिकांसाठीच अर्ज प्राप्त झाले. या प्रक्रियेत अनेक लाभार्थ्यांनी विविध कारणांमुळे सदनिका स्वीकारण्यास नकार दिल्याने किंवा प्रतिसाद न दिल्याने मोठ्या प्रमाणावर सदनिका रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
पीएमआरडीएच्या आकडेवारीनुसार, एकूण ८७१ सदनिकांपैकी ३९९ लाभार्थ्यांनी आपली सदनिका स्वीकारली आहे. मात्र तेवढ्याच म्हणजे ३९९ लाभार्थ्यांनी सदनिका नाकारल्या आहेत. याशिवाय ७३ लाभार्थ्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. अशा लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया रद्द करण्यात येणार आहे. परिणामी जवळपास निम्म्याहून अधिक सदनिका पुन्हा वितरणासाठी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा यादीतील नागरिकांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. सुरुवातीला सोडतीत नाव न लागलेल्या अर्जदारांना आता या रिक्त झालेल्या सदनिकांसाठी संधी दिली जाणार आहे. पीएमआरडीएकडून लवकरच यासंदर्भातील पुढील कार्यवाही सुरू होणार असून, संबंधित लाभार्थ्यांना सूचना देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील अर्जदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, सदनिका नाकारण्यामागे विविध कारणे समोर येत आहेत. काही लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे रक्कम भरणे शक्य झाले नाही, तर काहींना सदनिकेचे ठिकाण किंवा सुविधा पसंत पडल्या नाहीत. तसेच काही अर्जदारांनी वेळेत कागदपत्रे पूर्ण न केल्यामुळे किंवा प्रशासनाशी संपर्क साधला नाही, त्यामुळे त्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली. यामुळे पीएमआरडीएला पुन्हा वितरणाची प्रक्रिया राबवावी लागत आहे.
———
अशी आहे आकडेवारी –
एकूण सदनिका : 871
सदनिका स्वीकारलेले लाभार्थी : 399
सदनिका नाकारलेले लाभार्थी : 399
कोणतीच प्रक्रिया न केलेले लाभार्थी : 73
———
प्रतिक्रिया :
काही लाभार्थ्यांनी सदनिका स्वीकार केलेल्या नाहीत. तर काहींनी स्वीकार केलेल्या आहेत. ज्या सदनिका लाभार्थ्यांनी नाकारल्या आहेत. तिथे प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. लवकरच ती प्रक्रिया सुरू करत आहोत.
– पूनम मेहता, सहआयुक्त, जमीन व मालमत्ता विभाग, पीएमआरडीए.
————————
प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल
संपर्क क्रमांक : 7350266967
