विधानपरिषद उमेदवारीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडेच

बारामती होस्टेल येथे राष्ट्रवादीची मॅरेथॉन बैठक; पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

पिंपरी | प्रदीप लोखंडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बारामती होस्टेल येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे आजी-माजी आमदार, शहराध्यक्ष, नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. विधानपरिषद उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर समोर आली.

बैठक दोन टप्प्यांत पार पडली. सकाळच्या सत्रात पक्षातील आजी-माजी आमदार, शहराध्यक्ष आणि प्रमुख नेत्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी विधानपरिषद निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढविण्याचा निर्णय यावेळी स्पष्ट करण्यात आला. उमेदवारीबाबत विविध इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येणार असले तरी अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केल्याचे उपस्थितांनी सांगितले. “जो निर्णय होईल, तो योग्य वेळी जाहीर केला जाईल,” असेही त्यांनी बैठकीत नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दुपारच्या सत्रात पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या वेळी शहरातील प्रलंबित विकासकामे, महापालिकेतील विविध प्रश्न, पायाभूत सुविधांची गरज तसेच राजकीय परिस्थिती याबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यावर तत्काळ लक्ष घालण्याची मागणी स्थानिक प्रतिनिधींनी केली. त्यावर सुनेत्रा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमधून अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आली आहेत. त्यामध्ये नाना काटे, योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, संदीप वाघेरे, अजित गव्हाणे आणि भाऊसाहेब भोईर यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *