विनापरवाना वर्ग सुरू ? १५ दिवसांत खुलासा सादर करा 

चऱ्होलीतील डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूलला महापालिकेची नोटीस

पिंपरी । राईट अँगल 

चऱ्होली येथील नामांकित डीवाय पाटील इंटरनॅशनल स्कूल संस्थेच्या शाळेतील इयत्ता सहावी ते दहावीच्या वर्गांना शिक्षण विभागाची स्वमान्यता आणि तुकडी मान्यता नसल्याचे महापालिकेच्या तपासणीत उघड झाले आहे. या गंभीर बेकायदेशीर प्रकारामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शासनाच्या शाळा संहिता आणि बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियमाचे सरळ-सरळ उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी शाळेवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडील प्राप्त तक्रारीनुसार शाळेच्या कागदपत्रांची आणि मान्यतांची नियमित तपासणी करण्यात आली. यामध्ये चऱ्होलीतील डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूलची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान शिक्षण अधिकाऱ्यांना आढळून आले की, शाळेकडे प्राथमिक वर्गांची परवानगी असली, तरी इयत्ता सहावी ते दहावीच्या वर्गांसाठी आवश्यक असणारी अंतिम स्वमान्यता आणि तुकडी मान्यता मिळालेली नाही. योग्य परवानग्या आणि आवश्यक शासकीय मान्यता न घेताच संस्थेने हे वर्ग सुरू ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले.

महापालिकेने दिलेल्या नोटिसीमध्ये स्पष्ट केले आहे की, कोणत्याही शाळेला नवीन वर्ग किंवा तुकड्या सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाची रीतसर मंजुरी घेणे बंधनकारक असते. डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूलने या नियमांना बगल दिली आहे. हा प्रकार ‘महाराष्ट्र शाळा संहिता’ आणि ‘बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९’ (आरटीई) मधील तरतुदींचे थेट उल्लंघन ठरतो. मान्यता नसलेल्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणे आणि शिक्षण देणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

या अनधिकृत वर्गांमुळे शाळेत शिक्षण घेत असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आता टांगणीला लागले आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून शाळेला आपले म्हणणे मांडण्यासाठी मर्यादित मुदत दिली आहे. या मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास किंवा त्रुटींची पूर्तता न झाल्यास शाळेवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच विनामान्यता सुरू असलेले वर्ग त्वरित बंद करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. अनधिकृत शाळा आणि वर्गांवर महापालिका यापुढेही अशीच कडक मोहीम राबवणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

—————–

कोट

च-होलीतील डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूलने इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत वर्गाची मान्यता व इतर कार्यालयीन मान्यता घेतलेल्या आहेत. तर इयत्ता सहावी ते दहावीच्या वर्गाना स्वमान्यता व तुकडी मान्यता घेतलेली नाही. यामुळे शाळा संहिता व शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) उल्लंघन शाळेकडून झालेले आहे. त्यानूसार संबंधित शाळेला नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. सदर शाळेने विहित मुदतीत खुलासा न सादर केल्यास शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेवर पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

-संगिता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका. पिंपरी-चिंचवड

——————

कोट

च-होलीतील डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूलकडून बेकायदेशीरपणे सहावी ते दहावी पर्यंत वर्ग हे स्वमान्यता व तुकडी मान्यता न घेता सुरु ठेवले आहेत. त्यामुळे संबंधित शाळेने बेकायदेशीर विद्यार्थी प्रवेश राबवून विविध शुल्कची पालकांकडून आकारणी केलेली आहे. त्यामुळे संबंधित शाळेच्या संस्था संचालकावर तात्काळ कारवाई करुन पालकांची शुल्क परत करावेत.

– धम्मराज साळवे, अध्यक्ष, रयत विद्यार्थी विचार मंच 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *