दापोडी पोलिसांकडून गुन्हा दाखल; दहा जणांचा मृत्यू, पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू
पिंपरी । राईट अँगल
दापोडी पोलीस ठाणे हद्दीतील फुगेवाडी परिसरात विषारी हातभट्टी दारू प्रकरणात दहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिनांक २६ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत विषारी गावठी हातभट्टी दारूचे सेवन केल्याने संबंधितांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले असून, याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात दिनांक २९ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पांडुरंग सखाराम फुगे (वय ५३), अकबर अजिमखान पठाण (वय ४८), राजेश शांताराम राजपूत (वय ५०), आनंद पांडेराव देसाई (वय ५३), आनंद काशीनाथ निकाळजे (वय ६४), भिमण्णा बसण्णा नागराल (वय २७), अक्षय अशोक अवसरमल (वय २८), सचिन रामचंद्र नेटके (वय ३६), सुरप्पा मनप्पा बंगारी (वय ५५) आणि राजू प्रकाश राठोड (वय ३४), सर्व रा. फुगेवाडी, दापोडी, पुणे यांचा मृत्यू झाला आहे. मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा सी.ए. तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. संबंधित अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.
दरम्यान, आरोपींनी तयार केलेल्या विषारी हातभट्टी दारूचे सेवन केल्याने सुभाष डिग्गीकर (वय ६६, रा. फुगेवाडी), चंदन रामबली कुमार (वय २६, रा. दापोडी), श्रीमंत शिवपुत्र कोळी (वय ५२, रा. फुगेवाडी), जितू मनोहर शेदतपुरी (वय ३१, रा. फुगेवाडी) आणि प्रकाश उमाजी राठोड (वय ६५, रा. फुगेवाडी) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना औंध येथील मेडीपॉईंट हॉस्पिटल तसेच पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी कर्नेलसिंह तखतसिंह विरका (वय ७३), गुरमंगतसिंह कर्नेलसिंह विरका, योगेश रामचंद्र व्हानकडे (वय २३, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) आणि राधेशाम हरिराम प्रजापती (वय ३५, रा. उरळीकांचन, पुणे) यांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तसेच इंदरजीत कौर कर्नेलसिंह विरका (वय ६०, रा. डेक्कन पेपर मिलजवळ, संजय नगर, फुगेवाडी, पुणे) आणि कल्पेश अशोक आग्रवाल (वय २९, रा. खडकी, पुणे) यांनाही अटक करण्यात आली असून त्यांना ३० मे रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या घटनेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने आकाश जाधव (रा. हडपसर), इरफान निसार कुरेशी (रा. पवार वस्ती, दापोडी) आणि आर्यन संजय धोत्रे (रा. गोखलेनगर) यांच्याविरोधातही कारवाई केली आहे.
