आ. रोहित पाटलांना जि. प. सदस्याच्या कामाचेही श्रेय पुरेना -संजयकाकांचा हल्लाबोल

‘हापापलेली प्रवृत्ती खपवून घेणार नाही’; नाव न घेता जोरदार हल्लाबोल, ‘जशास तसे उत्तर देऊ’चा इशारा

संकेत पाटील /तासगाव

खुजगाव येथील कार्यक्रमात बोलताना संजय काका पाटील म्हणाले, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत जमदाडे यांनी आपल्याला गाडीत या प्रकाराबाबत सांगितले. आमदारपदावर गेलेल्या व्यक्तीने कसे वागावे, याची किळसवाणी घटना ऐकायला मिळाली, असेही त्यांनी सांगितले.

टेंभू-म्हैसाळ पाणी योजनेसाठी सर्वाधिक निधी आणणारा खासदार म्हणून माझे नाव आहे. मात्र, त्याचे श्रेय घेण्यासाठी मी कधी सोशल मीडियावर पत्रके टाकली नाहीत. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्नही केला नाही. मात्र, जिल्हा परिषद सदस्याने आणलेल्या शाळेच्या खोल्यांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी येथे नारळ वाढवून जाण्याचा प्रकारही करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.

माझ्या खासदारकीच्या काळातील कामांचे श्रेय कोणी घेतले तरी मला अभिमान वाटला असता. पण जिल्हा परिषद सदस्याने आणलेल्या खोल्यांचेही श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे हापापलेली भिकारी प्रवृत्ती आहे, असा घणाघात संजयकाका पाटील यांनी केला.

कुठल्या कामात राजकारण करायचे आणि किती प्रसिद्धीची हाव ठेवायची, याला काही मर्यादा असतात. पंधरा दिवस सोशल मीडियावर बसून केलेली कामे आणि घेतलेले श्रेय लोकांसमोर मांडले, तर लोकांना खरा चेहरा दिसेल. लोकांचा पैसा असून त्यातून होणाऱ्या कामाची स्वतःच्या नावाने प्रसिद्धी करण्याची गरज नाही, असेही त्यांनी सुनावले.

‘ फसवून राजकारण पुढे जाणार नाही. माझा पराभव झाला, तो मी स्वीकारला आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. लोकांनी तुम्हाला जबाबदारी दिली आहे, याचे भान ठेवावे. पदाचा उपयोग लोकांसाठी केला पाहिजे. राजकारणात दिशाभूल आणि नौटंकीकरण चांगले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

तुम्ही केलेल्या कामांची माहिती लोकांना जरूर द्या; मात्र अशा प्रकारची कृती पुन्हा केली, तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा संजय काका पाटील यांनी दिला.

खुजगावच्या शाळा भूमिपूजन कार्यक्रमातील या आक्रमक भाषणामुळे तासगाव तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, संजय काका पाटील यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

चौकट :
शरद पवारांना शिव्या देणाऱ्याची तुम्ही मदत घेतली.
विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांवरही संजय काका पाटील यांनी भाष्य केले. विधानसभा निवडणुकीत कोणी कोणाचे पैसे घेऊन काम केले, हे आम्हाला सांगायला लावू नका, असा इशारा देत
ज्या शरद पवारांनी तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना राजकारणात इथपर्यंत आणले, त्यांच्यावर टीका करणाऱ्या, त्यांना शिव्या देणाऱ्या व्यक्तीची मदत घेऊन विधानसभा निवडणूक जिंकली, हे आम्हाला बाहेर काढायला लावू नका, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *