संकेत पाटील /तासगाव
ज्या आर. आर. आबांनी व्यसनमुक्तीचा संदेश देत महाराष्ट्राला नवी दिशा दिली, त्यांच्याच पुतळ्यासमोर दारूचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार तासगावात समोर आला आहे. पुतळ्यासमोरील दारूच्या दुकानातून दारू खरेदी करून काही जण थेट पुतळ्याच्या परिसरातील कट्ट्यावर बसून मद्यपान करत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, हे दारूचे दुकान बंद करण्याची मागणी उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांनी केली आहे.
तासगाव नगरपालिकेच्या मासिक सभेत हा विषय यावेळी त्यांनी मांडला.
यावेळी बोलताना प्रसाद पैलवान म्हणाले की, आर. आर. आबांचा पुतळा उभारणीसाठी परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे काम माजी खासदार संजयकाका पाटील यांनी तात्काळ करून दिले होते. तसेच पुतळ्याचा परिसर सुशोभित व स्वच्छ ठेवण्यासाठी १६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मोठ्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या या परिसराच्या समोरच दारूचे दुकान असल्याने आता या परिसराच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
दारूच्या दुकानासमोर दारू खरेदीसाठी येणारे नागरिक रस्त्यावरच दुचाकी व चारचाकी वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या मार्गावरील ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक सुरळीत ठेवताना पोलिसांचीही दमछाक होत असल्याचे चित्र आहे.
दारू खरेदी केल्यानंतर काही जण पुतळ्याच्या परिसरातील कट्ट्यावर बसून मद्यपान करीत असल्याने हा परिसर अस्वच्छ होण्याबरोबरच सामाजिक वातावरणाबाबतही त्याचा परिणाम होत आहे. आबांच्या पुतळ्यासमोर असणारे मद्यपान हे आबांच्या विचारांना शोभणारे नाही, अशी भावना पैलवान यांनी व्यक्त केली.

पालिका सभेत दारू दुकान बंद करण्याची मागणी…
तासगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांनी नगरपालिका सभेत हा प्रश्न उपस्थित करून संबंधित दारूचे दुकान बंद करण्याची मागणी केली. आबांच्या पुतळ्यासमोर दारुचे दुकान व परिसरातील सामाजिक वातावरण, नागरिकांची गैरसोय आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता या दुकानाबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या मागणीनंतर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे तासगावकरांचे लक्ष लागले आहे.

आबांनी राज्यात व्यसनमुक्तीचा विचार रुजवण्यासाठी मोठे काम केले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर म्हणून उभारलेल्या पुतळ्याचा परिसर हा प्रेरणादायी असला पाहिजे, तोच हा विरोधाभास संतापजनक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मनसेच्या अमोल काळे यांनीसुद्धा केला होता याबाबत पाठपुरवठा.
मनसेचे सांगली जिल्हा संघटक अमोल काळे यांनीसुद्दा सन 2023 मध्ये हे दुकान शहराच्या मध्यवस्तीत नको असा पाठपुरावा केला होता.
