तासगाव येथे ३ सप्टेंबर १९४२ च्या ऐतिहासिक मोर्चाचा स्मृतीदिन उत्साहात साजरा

संकेत पाटील /तासगाव

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी, क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड, पद्मभूषण वसंतदादा पाटील, भाई गणपतराव कोळी, धोंडीराम बापू माळी यांच्यासह हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी तासगावच्या प्रमुख मार्गावरून मोर्चा काढून तत्कालीन ब्रिटिशांच्या तहसील कचेरीवरून युनियन जॅक उतरवून तिरंगा ध्वज फडकवला होता. ब्रिटिश न्यायाधीश आणि तहसीलदारांना गांधी टोपी घालायला लावण्याची ती ऐतिहासिक घटना आजही प्रत्येक तासगावकराला स्फूर्ती देते.

या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून आज तहसील कार्यालय परिसरातील स्वातंत्र्यसैनिक स्मृतीस्तंभावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वारसदार संघटना, सांगलीचे अशोक पोरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

प्रारंभी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाला फुलांच्या माळांनी सजवून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वामी रामानंद भारती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे स्वागत नूतन परीट यांनी केले.

यावेळी भारती विद्यामंदिरचे प्राचार्य परमानंद भोसले, प्रा. वासुदेव गुरव, कुमार पाचोरे, तावरे मॅडम यांनी या ऐतिहासिक लढ्यावर आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित विद्यार्थ्यांना या घटनेची माहिती देणारे पत्रक वाटण्यात आले. कार्यक्रमस्थळी ‘भारतमाता की जय’ आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

या कार्यक्रमास प्रा. राजेश रोमन, प्रा. बाळासाहेब मोरे, दत्तात्रय बामणे, बाबुराव जाधव, भरत थोरात, बाबुराव थोरात, भीमराव भंडारे, सचिन पाटील यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी व तासगावकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी अमर खोत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *