संकेत पाटील /तासगाव
तासगाव शहरात पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांची आता खैर नाही. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नळधारकांवर तासगाव नगरपरिषदेने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. अपव्यय करणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड आणि त्यानंतरही सुधारणा न झाल्यास थेट नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा नगरपरिषदेने दिला आहे.
याबाबत नगरपरिषदेने शहरातील सर्व नळधारकांना सात दिवसांचे अंतिम आवाहन केले आहे. तासगाव शहर आणि वासुंबे हद्दीतील सर्व नळ कनेक्शन धारकांनी आपल्या प्रत्येक नळाला तोटी (नळाचे तोटे) आणि घरावरील पाण्याच्या टाकीला बॉलकॉक (फ्लोट व्हॉल्व्ह) सात दिवसांच्या आत बसवून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी पाणी भरून झाल्यानंतरही नळाची तोटी बंद केली जात नाही, तसेच टाकी भरल्यानंतर टाकीतून पाणी रस्त्यावर वाहत असते. यामुळे हजारो लिटर शुद्ध पाण्याचा रोज अपव्यय होत आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर नगरपरिषदेने हा कडक निर्णय घेतला आहे.
नगरपरिषदेच्या भरारी पथकाकडून शहरात पाहणी केली जाणार आहे. यावेळी नळाची तोटी उघडी ठेवून पाणी वाहत असल्याचे किंवा टाकीतून पाणी ओव्हरफ्लो होत असल्याचे आढळल्यास संबंधित नळधारकाला पहिल्यांदा 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. दंड भरूनही पुन्हा तीच चूक केल्यास संबंधिताचे नळ कनेक्शन कायमस्वरूपी तोडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पाणी ही काळाची गरज असून प्रत्येक थेंब वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि नगरपरिषदेच्या सूचनेनुसार सात दिवसांत आवश्यक उपाययोजना पूर्ण करावी, असे आवाहन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापती व मुख्याधिकारी यांनी संयुक्तपणे केले आहे.
