संकेत पाटील /तासगाव
मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या तासगावच्या ऐतिहासिक श्रीगणपती मंदिरात यंदाचा भाद्रपद मासोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे. उद्या शनिवार, दि. १२ सप्टेंबरपासून ते बुधवार दि. १६ सप्टेंबरपर्यंत पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.
इ.स. १७८१ ते १७९५ या काळातील मराठा साम्राज्याचे सेनापती श्रीमंत परशुराम (भाऊ) पटवर्धन यांनी तासगाव प्रांतात स्थापन केलेल्या सार्वजनिक गणपतींपैकी हे एक मंदिर असून, येथील उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाचा हा २४७ वा अखंड वार्षिक उत्सव आहे.

दररोज धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
पाचही दिवस मंदिरात सकाळपासून भाविकांसाठी विविध कार्यक्रम होणार आहेत.
- दरोज दुपारी १२ वा: श्रींची षोडशोपचार महापूजा. पं. दीपक जोशी आणि पं. अनंत शास्त्री जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा होईल.
- दररोज सायं. ४.३० ते ६ वा: ह.भ.प. कीर्तनकलाविभूषण गजाननबुवा वाठारकर यांचे नारदीय कीर्तन.
- दररोज सायं. ६.१५ वा: गौरी हत्तीणीच्या नेतृत्वाखाली सुशोभित छबिना काढण्यात येणार आहे.
पाच दिवसांचे विशेष आकर्षण –
रविवार (दि. १३) – शास्त्रीय मैफल:
सायंकाळी ७ वाजता पं. राजेंद्र परशुराम पटवर्धन यांचे शास्त्रीय सतारवादन होणार असून, त्यांना तबल्यावर पं. विनायक हसबनीस साथसंगत करणार आहेत.
सोमवार (दि. १४) – मंत्रजागर:
गणेश चतुर्थीनिमित्त सायं. ७ ते ८ या वेळेत पं. अनंत शास्त्री जोशी यांच्या उपस्थितीत मंत्रजागर होणार आहे.
मंगळवार (दि. १५) – रथयात्रा:
ऋषिपंचमीच्या दिवशी दुपारी १ ते सायं. ५.३० वाजेपर्यंत श्रींच्या भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सवाचा सर्वात मोठा आकर्षण सोहळा असणार आहे.

बुधवार (दि. १६) – सांगता:
सकाळी ९ वाजता श्रींच्या ललितांच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.
या संपूर्ण उत्सवाचे आयोजन मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अध्यक्ष राजेंद्र परशुराम पटवर्धन, सचिव सौ. सितारा राजेंद्र पटवर्धन आणि सदस्य राहुल राजेंद्र पटवर्धन यांच्यासह मंदिराचे प्रमुख सरव्यवस्थापक पवनसिंह कुडमल, व्यवस्थापक अथर्व अनंत जोशी, अशोक कुंभार यांनी सर्व तयारी पूर्ण केली असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारंपरिक वारसा वृद्धिंगत करावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.
