२४ वर्षांच्या निष्ठावान देशसेवेला अखेरचा सलाम; अश्रूपूर्ण नयनांनी दिला निरोप
संकेत पाटील /तासगाव
सांगली जिल्ह्यातील सावळज (ता. तासगाव) येथील सुपुत्र सुभेदार संदीप गजानन वांडरे (वय ४३) यांनी भारतीय सैन्यदलात सलग २४ वर्षे निष्ठा, शौर्य आणि समर्पणाने देशसेवा केली. पंजाबमधील फरीदाकोट येथे लष्करी अभियांत्रिकी सेवेत गॅरिसन इंजिनिअर म्हणून कर्तव्य बजावत असताना अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर सावळज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुभेदार वांडरे यांच्या निधनाची वार्ता सावळज गावात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली. शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव सावळज येथे आणण्यात आले. राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आल्यानंतर ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच आजी-माजी सैनिकांनी अखेरचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

यावेळी भारतीय सैन्यदलाच्या तुकडीकडून शासकीय इतमामात विशेष मानवंदना देण्यात आली. माजी आमदार सुमनताई पाटील, तहसीलदार अतुल पाटोळे, पोलीस निरीक्षक विशाल टकले, सांगली जिल्हा सैनिक कार्यालयाचे प्रतिनिधी, विविध आजी-माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, सावळज परिसरातील लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांनी पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानाला श्रद्धांजली वाहिली.
यानंतर सुभेदार संदीप वांडरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. २४ वर्षे देशाच्या संरक्षणासाठी सेवा बजावलेल्या या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
२४ वर्षांची अभिमानास्पद देशसेवा
सुभेदार संदीप वांडरे यांनी भारतीय सैन्यदलात तब्बल २४ वर्षे सेवा बजावली. सेवाकाळात विविध ठिकाणी कर्तव्य बजावत त्यांनी देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या निधनाने सावळज गावाने देशसेवेला समर्पित एक वीर सुपुत्र गमावला.

प्रतिक्रिया व्यक्त करा