- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष.
पिंपरी । प्रदीप लोखंडे
पिंपरी-चिंचवड शहर हे अनेक वर्षांपासून पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. मात्र दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर या बालेकिल्ल्याचे नेतृत्व आता कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात अजित पवारांचे प्रभावी नेतृत्व होते. त्यांच्या निर्णयक्षम शैलीमुळे आणि आक्रमक प्रचारामुळे पक्षाची संघटना शहरात मजबूत राहिली होती. त्यांच्या पश्चात निर्माण झालेल्या नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सध्या पवार कुटुंबातील पुढील पिढी सक्रिय राजकारणात आहे. पार्थ पवार नुकतेच राज्यसभा खासदार झाले आहेत. दुसरीकडे रोहित पवार हे आमदार म्हणून राज्याच्या राजकारणात आपली छाप पाडत आहेत. तर सुनेत्रा पवार या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत असल्याने राज्याच्या सत्ताकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील पक्ष संघटना आणि स्थानिक नेतृत्व कोण सांभाळणार, हा प्रश्न आता अधिक चर्चेत आला आहे.
यापूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रितपणे काम करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे झाली आणि पक्षाची ताकदही वाढली. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत अजित पवार यांनी आक्रमक प्रचार केला होता. भाजपच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले. त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ३० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले होते आणि शहरात पक्षाची ताकद स्पष्टपणे दिसून आली होती.
मात्र सध्या अजित पवारांच्या पश्चात शहरातील राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादीकडून फारसे सक्रिय नेतृत्व दिसत नसल्याचे चित्र आहे. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिशा देणारे राज्य पातळीवरचे नेतृत्व कोणाकडे असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आगामी काळात भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पवार कुटुंब शहरातील राजकारणात पुन्हा सक्रिय होणार का, याबाबतही चर्चा सुरू आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकाऱ्यांना बळ देणे, संघटना मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना मानसिक धैर्य देणे ही मोठी जबाबदारी आता नव्या नेतृत्वावर असेल. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील पवारांचा बालेकिल्ला पुढे कोणाच्या नेतृत्वाखाली टिकून राहतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसला किती यश मिळते, हे येणारा काळच ठरवणार आहे.
————————————-
बातमीसाठी संपर्क : 7350266967

प्रतिक्रिया व्यक्त करा