मोशीतील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या 50 कोटींच्या निविदेत रिंग

पिंपरी । राईट अँगल

मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील विकास कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदांवर अनियमिततेचा संशय व्यक्त करत शिवसेना स्थायी समिती सदस्य सुलभा उबाळे यांनी आक्षेप नोंदवला आहे. पुतळ्याला किंवा त्या ठिकाणच्या विकासकामांना आमचा अजिबात विरोध नसून, छत्रपती संभाजी महाराज हे देशाची अस्मिता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उबाळे म्हणाल्या की, पुतळा परिसरातील विद्युत विषयक कामे आणि सुशोभीकरणासाठी ३२ कोटी ३४ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली असून ती ० टक्के दराने दाखल झाली आहे. तसेच परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व इतर विद्युत विषयक कामांसाठी १८ कोटी ६६ लाख रुपयांच्या दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या असून त्यासाठी ठेकेदाराने सुमारे सात टक्के दर दिला आहे.

ही कामे संवेदनशील असून निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात ‘रिंग’ झाल्याचा संशय असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा विकास कामांच्या नावाखाली दोन्ही निविदांमधून सुमारे ५० कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जर ही कामे निकोप स्पर्धेद्वारे सुमारे ३० टक्के ‘बिलो’ दराने झाली असती, तर महापालिकेचे सुमारे १५ कोटी रुपये वाचले असते, असा दावा उबाळे यांनी केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट असल्याचेही त्यांनी सांगितले. चालू वर्षातील अर्थसंकल्पातील सुमारे ८० टक्के निधी हा प्रशासकीय काळात मंजूर झालेल्या प्रकल्पांवर खर्च होणार असून नवीन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध होण्याची अडचण निर्माण झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा आम्हाला अभिमान आहे; मात्र त्यांच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांना आमचा विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दोन्ही कामांची प्रत्यक्ष पाहणी पत्रकारांसोबत करून वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच निर्णय घ्यावा, तोपर्यंत हे विषय पुढील सभेपर्यंत तहकूब ठेवावेत, अशी मागणी उबाळे यांनी केली. यावर सभापती अभिषेक बारणे यांनी हे विषय पुढील सभेपर्यंत ठेवण्याची घोषणा केली.
—————————-
बातमीसाठी संपर्क : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *