कोट्यवधींचा खर्च ; छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्प अपूर्ण

सहा वर्षांत ६५ कोटींहून अधिक खर्च; आता नव्याने ५० कोटींच्या निविदा

पिंपरी । राईट अँगल

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील विनायकनगर परिसरात १०० फूट उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय जानेवारी २०२० मध्ये घेण्यात आला होता. या कामासाठी सुमारे १२ कोटी ५० लाख रुपयांचा अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते आणि ठेका मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आला. १६ मार्च २०२० रोजी काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते.

या प्रकल्पासाठी सुरुवातीला दीड वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्याने ठेकेदाराला ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी विनायकनगर येथील प्रस्तावित ठिकाणाऐवजी पुतळा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जागेत उभारण्याची मागणी केली. त्यानुसार मोशी सेक्टर क्रमांक ५ आणि ८ मधील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्वेन्शन सेंटर परिसरात जागा देण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी पीएमआरडीएने जुलै २०२३ मध्ये सुमारे २.५० एकर जागा महापालिकेला उपलब्ध करून दिली. सध्या पुतळ्याचे काम या ठिकाणी सुरू असल्याचे सांगितले जाते.

बोऱ्हाडेवाडी परिसरात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुतळ्यासाठी आणि संबंधित विकास कामांसाठी सुमारे १२ कोटी ४७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. या कामाची मुदत सप्टेंबर २०२१ होती; ती वाढवून मार्च २०२४ पर्यंत करण्यात आली.

दरम्यान, मुख्य पुतळा उभारणीसाठी जवळपास ३२ कोटी ८४ लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. या कामाची मुदतही फेब्रुवारी २०२२ वरून वाढवून डिसेंबर २०२४ पर्यंत करण्यात आली. याशिवाय पीएमआरडीएच्या जागेवर पुतळा उभारणीसाठी सुरुवातीला १५ कोटींची निविदा काढण्यात आली होती. नंतर सुधारित प्रस्तावात आणखी ५ कोटी ४१ लाख रुपयांची वाढ करण्यात आली.

या सर्व कामांवर आतापर्यंत सुमारे २० कोटी ५२ लाख रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले जाते. तरीही मार्च २०२५ पर्यंत काम पूर्ण होण्याचे लक्ष्य गाठले गेलेले नाही. त्यामुळे संभाजी महाराजांचा पुतळा आणि परिसर विकास या प्रकल्पावर एकूण ६५ कोटी ८१ लाख रुपयांहून अधिक खर्च होऊनही प्रकल्प अपूर्णच असल्याची टीका होत आहे. वारंवार मुदतवाढ मिळणाऱ्या ठेकेदाराबाबतही विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पुतळा परिसरातील विद्युत आणि स्थापत्य कामांच्या नावाखाली नव्याने दोन निविदांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. पहिल्या प्रस्तावानुसार स्थापत्य कामांसाठी १३ कोटी ७४ लाख ७६ हजार आणि विद्युत कामांसाठी १८ कोटी ६६ लाख, असा एकूण ३२ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च सुचविण्यात आला होता. दुसऱ्या प्रस्तावात पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईसाठी १३ कोटी ८४ लाख ८२ हजार आणि स्थापत्य कामांसाठी ६ कोटी ४२ लाख ३५ हजार, असा एकूण २० कोटी २७ लाख १७ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला. मात्र, या निविदांमध्ये रिंग झाल्याचा आरोप करत विरोधकांनी दोन्ही प्रस्तावांना तीव्र विरोध केला. त्यामुळे स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांना महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असतानाही हे दोन्ही प्रस्ताव तहकूब ठेवावे लागले.

संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर मोठा खर्च करूनही काम अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या प्रकल्पाचे ठेकेदार मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन यांनी ३२ कोटी ३४ लाख रुपयांच्या कामासाठी ० टक्के दर दाखवल्याने या पैशांवर नेमका कोणाचा डोळा आहे, हे सांगण्याची गरज नसल्याचा आक्षेप विरोधकांनी नोंदवला आहे. तसेच विद्युत रोषणाईच्या १८ कोटी ६६ लाख रुपयांच्या कामासाठी ७ टक्के दर दाखविण्यात आला. या निविदांना मंजुरी देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत असताना विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतल्याने स्थायी समितीला अखेर माघार घ्यावी लागली. संभाजी महाराजांच्या पुतळा विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, या प्रकरणामागे नेमके कोणाचा हात आहे, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या बाबत स्थापत्यचे सह शहर अभियंता माहिती देताना म्हणाले की, पुतळा प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. पुढील काही दिवसांत शंभर टक्के काम पूर्ण केले जाणार आहे.आर्थिक खर्चाला मान्यता मिळाल्यानंतर पुतळा परिसरातील काही कामे तातडीने पूर्ण केली जातील.


बातमीसाठी संपर्क : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *