पुणे । राईट अँगल
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना जुनी दुखापत वाढल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली असून डॉक्टरांनी त्यांना किमान एक महिन्याची सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सुमारे २९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेल्या दुखापतीकडे त्यांनी दीर्घकाळ दुर्लक्ष केले होते. मात्र अलीकडच्या काळात त्या दुखापतीचा त्रास वाढू लागल्याने अखेर शस्त्रक्रिया करणे अपरिहार्य ठरले.
मोहोळ यांनी सोशल मीडियावर ही माहिती देताना सांगितले की, संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच ही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशनातील कामकाज, देशभरातील दौरे, पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर विविध कार्यक्रमांपासून काही काळ दूर राहावे लागणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यातच यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाही असल्याने या सर्व कामांपासून दूर राहावे लागणे अधिक खटकत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तथापि नागरिकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांच्या बळावर आपण लवकर बरे होऊन महिन्याभरात पुन्हा पूर्वीपेक्षा अधिक जोमाने जनसेवेत हजर होऊ, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.
———————————
प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल
बातमीसाठी संपर्क : 7350266967
