– चाफेकर चौक परिसरात 21 मार्चला सकाळी ५ ते १ पर्यंत निर्बंध
पिंपरी । राईट अँगल
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर निगडी वाहतूक विभागाच्या हद्दीत चाफेकर चौक येथील ईदगाह मैदानावर मोठ्या प्रमाणात नमाज पठणासाठी नागरिकांची गर्दी अपेक्षित असल्याने २१ मार्च २०२६ रोजी (चंद्र दर्शनानुसार एक दिवस पुढे-मागे) परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. सकाळी ५ ते दुपारी १ वाजेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.
पोलीस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार, मरीआई माता मंदिर ते चाफेकर चौक, चाफेकर चौक ते मरीआई माता मंदिर तसेच मोरया नगर ते चाफेकर चौक या मार्गांवरील सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येणार आहे (अत्यावश्यक सेवा वगळून).
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून, एसकेएफ कंपनीकडून अहिंसा चौक मार्गे, तसेच मरीआई माता मंदिर परिसरातून सेव्हन ऑरेंज हॉस्पिटलमार्गे वाहनांना वळविण्यात येणार आहे. तसेच चाफेकर चौक येथून जुना जकात नाका व अहिंसा चौक मार्गे वाहतूक वळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मोरया नगरकडून येणाऱ्या वाहनांसाठी हनुमान मंदिर परिसरातून सेव्हन ऑरेंज हॉस्पिटलमार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
—————————
बातमीसाठी संपर्क : 7350266967
