गुढीपाडवा मेळाव्यासाठी ५० बस; पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष
पिंपरी । प्रदीप लोखंडे
पिंपरी-चिंचवड शहरातून गुढीपाडवा मेळाव्यासाठी सुमारे दोन हजार मनसैनिक मुंबईकडे रवाना होणार आहेत. या मेळाव्यासाठी शहरातील विविध भागांतून कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असून ५० बस तसेच अनेक चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील विविध प्रभागांतून कार्यकर्ते एकत्र येत असून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरप्रमुख सचिन चिखले यांच्या नेतृत्वात याचे आयोजन केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या गुढीपाडवा मेळाव्याला मनसेसाठी विशेष महत्त्व आहे. त्यांच्या भाषणाकडे केवळ कार्यकर्त्यांचेच नव्हे, तर राज्यातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. आगामी राजकीय दिशा, संघटनात्मक बदल आणि पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या मनसेचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यात काही प्रमाणात मरगळ जाणवत आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि संघटन पुन्हा बळकट करण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. मेळाव्यानंतर शहरात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नव्या रणनीती आखल्या जाणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.
गुढीपाडवा मेळावा हा मनसेचा पारंपरिक आणि महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित राहतात. यंदाही पिंपरी-चिंचवडमधून मोठ्या संख्येने मनसैनिक सहभागी होत असल्याने पक्षातील एकजूट आणि ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या मेळाव्यातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवी दिशा आणि ऊर्जा मिळेल, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक सक्रिय होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळेच या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून पिंपरी-चिंचवडमधील मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
——————————-
बातमीसाठी संपर्क : 7350266967
