पासपोर्ट सेवा कार्यक्रम व तांत्रिक सुधारणा यावर मार्गदर्शन
पिंपरी । राईट अँगल
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार पोलीस आयुक्त कार्यालयातील “शिवनेरी हॉल” येथे पासपोर्ट पडताळणी संदर्भात प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात पोलीस अधिकारी व अंमलदारांना पडताळणी प्रक्रिया अधिक जलद व कार्यक्षम करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षण सत्रात प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड, पोलीस उप-आयुक्त प्रदीप जाधव, उप पासपोर्ट अधिकारी श्रुती पांडे यांच्यासह विशेष शाखा व विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी उपस्थित होते. यावेळी पासपोर्ट पडताळणीतील तांत्रिक सुधारणा, अचूक व वेळेत अहवाल सादर करण्याच्या पद्धती आणि पोलीस व पासपोर्ट विभागातील समन्वय यावर भर देण्यात आला.
डॉ. गायकवाड यांनी पासपोर्ट सेवा अधिक पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली, तर श्रुती पांडे यांनी पासपोर्ट सेवा 2.0 प्रणालीमुळे पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ व वेगवान झाल्याचे सांगितले. सत्रात प्रश्नोत्तरांद्वारे अधिकारी व अंमलदारांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या प्रशिक्षणामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस व प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होऊन नागरिकांना जलद व दर्जेदार सेवा देण्यास मदत होणार आहे.
—————————
प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल
बातमीसाठी संपर्क : 7350266967
