चर्चा नाही, फक्त मंजुरी! तासगाव पालिकेत सत्ताधाऱ्यांचा वरचष्मा; विरोधक आक्रमक

तासगाव । संकेत पाटील

सत्ताधाऱ्यांच्या जोरावर अवघ्या दोन मिनिटांत २५ विषय मंजूर करण्याचा विक्रम तासगाव नगरपरिषदेत घडला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विरोधी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन केले, ज्यामुळे पालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

नेमकं काय घडलं?

तासगाव नगरपालिकेची मासिक सभा शुक्रवारी पार पडली. माजी खासदार संजयकाका पाटील गटाची सत्ता आल्यानंतरची ही दुसरीच सभा होती. सभा सुरू होताच पहिल्या विषयाचे वाचन झाले आणि नगरसेवक अनिल कुत्ते यांनी सर्व २५ विषय बहुमताने मंजूर करण्याची मागणी केली. याला नगरसेवक संतोष बेले यांनी तत्काळ अनुमोदन दिले.

नगराध्यक्षा विजया पाटील यांनी कोणतीही चर्चा न घडवून आणता सभा संपल्याचे जाहीर केले आणि सभागृह सोडले. या संपूर्ण प्रक्रियेला केवळ दोन मिनिटांचा वेळ लागला.

विरोधकांचा संताप आणि आंदोलन
“शहरात अनेक समस्या आहेत, त्यावर आम्हाला बोलू द्या,” अशी विनंती विरोधी गटाचे नगरसेवक करत होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त विरोधी नगरसेवकांनी थेट मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांचे दालन गाठले. तिथे फरशीवर बसून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राजकीय आरोप-प्रत्यारोप
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर ‘हुकूमशाही’ चालवत असल्याचा आरोप केला आहे. निवडक प्रभागातील कामेच मार्गी लावली जात असून सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका यावेळी करण्यात आली. या घटनेमुळे तासगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या सुशीला जाधव म्हणाल्या की, सत्ताधारी गटाकडून बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी सुरू आहे. लोकशाही मार्गाने चर्चेला वाव न देण्याच्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो.

————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *