चार मोटारसायकली व घरफोडीचा गुन्हा उघड; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी । राईट अँगल
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने धडाकेबाज कारवाई करत वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून चार मोटारसायकली आणि एका घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत होती. त्यानुसार पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ श्वेता खेडकर यांनी महाळुंगे औद्योगिक परिसरातील चोरीच्या ठिकाणांचे क्राईम मॅपिंग, नाकाबंदी, कागदपत्र तपासणी, सतर्क पेट्रोलिंग तसेच सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने भोसरी पोलीस ठाण्याने निष्पन्न केलेला आरोपी प्रकाश तेज विश्वकर्मा (वय २०, रा. गणेश मंदिराजवळ, चक्रपाणी वसाहत, भोसरी, मूळ रा. महेंद्र नगर, नेपाळ) यास येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तांत्रिक तपास व सीसीटीव्हीच्या आधारे चौकशी केली असता त्याने महाळुंगे एमआयडीसी व परिसरातून चार मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याने एका घरफोडीचा गुन्हाही केल्याचे उघड झाले.
पोलीसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली आणि घरफोडीतील दीड ग्रॅम सोन्याचे पदक असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग अव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ श्वेता खेडकर, सह पोलीस आयुक्त महाळुंगे विभाग सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सपोनि भास्कर पुल्ली, तसेच पोलीस अंमलदार देवराम पारधी, विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, युवराज बिराजदार, चेतन सावंत, राजेंद्र खेडकर, राजेश गिरी, महेश गायकवाड, राजकुमार हणमंते, प्रशांत कसबे, शिवाजी मरकड, आकाश घाडगे यांनी पार पाडली.
——————————-
प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल
संपर्क क्रमांक : 7350266967
