सोलापूर: अशोक कांबळे
सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Solapur- Pune National highway) सावळेश्वर टोल नाका (Savleshwar toll plaza) तोडफोड आणि मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल झाले असून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार 24 मार्च 2026 रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास सावळेश्वर टोल नाका (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे एक ट्रक हा ओव्हरलोड असल्याचे आढळल्याने टोल कर्मचाऱ्यांनी ट्रक चालक सिध्दलिंगय्या राचय्या स्वामी (रा. ससापूर, ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) यास ८५ रुपये ओव्हरलोड पेनल्टी भरण्यास सांगितले. यावरून ट्रक चालकाने कर्मचाऱ्यांशी वाद घालून गोंधळ घातला. या वादाचे पर्यवसान हिंसक घटनेत झाले. तेथून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनीही या गोंधळात सहभाग घेऊन टोल नाक्यावरील बुथच्या काचा, संगणक, कॅमेरे आणि ऑफिसमधील साहित्याची दगडफेक करून तोडफोड केली. या गोंधळाचा फायदा घेऊन काही आरोपींनी टोलची जमा झालेली रोकडही चोरी केली आहे. या घटनेत अंदाजे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व त्यांच्या पथकाने (सपोनि अंजना फाळके, पोउनि कर्नेवाड, पोउनि शेळके व कर्मचारी) तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना उपचारासाठी मदत करण्यात आली असून सध्या घटनास्थळी शांतता आहे.
गुन्हे दाखल आणि संशयितांना अटक
या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात दोन परस्पर स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून तोडफोड प्रकरणी टोल मॅनेजर पवनकुमार राजेंद्रकुमार ब्राह्मण यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३३, ३२४(५), ३२४(३), ३०३(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १८९(३), १९०, १९१(२) अन्वये गुन्हा दाखल करून ०३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मारहाण प्रकरणी ट्रक चालक सिध्दलिंगय्या राचय्या स्वामी याच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करून ०२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपींना न्यायदंडाधिकारी, मोहोळ यांच्यासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.
