पोलीस आयुक्तांचा दणका ; अवैध मसाज पार्लर, स्पा सेंटर, लॉज बंद ।

  • चार वर्षात ३२ आस्थापना बंद करण्याचे आदेश जारी

पिंपरी । प्रदीप लोखंडे 

पिंपरी-चिंचवड शहरात अवैध स्पा सेंटर, मसाज पार्लर आणि लॉजच्या आडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाविरोधात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कठोर भूमिका घेत धडक कारवाई सुरू केली आहे. मागील तीन वर्षांच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात मसाज पार्लर, स्पा, हॉटेल, लॉज तसेच रहिवासी ठिकाणांच्या आडून अवैधरित्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या एकूण २९ आस्थापनांना एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश प्राथमिक चौकशीअंती जारी करण्यात आले आहेत. तर २०२६ मध्ये आणखी तीन आस्थापनांवर बंदीचे आदेश देण्यात आले. एकूण चार वर्षांत ३२ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. इतर संशयित आस्थापनांचीही चौकशी सुरू असून लवकरच पुढील आदेश देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, नुकतीच संत तुकाराम नगर पिंपरी येथील ‘रिच फील स्पा’ या नावाने सुरू असलेल्या स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली शेंडगे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 २५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे साडे चार वाजता संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन हद्दीत सम्राट चौक, पिंपरी येथे असलेल्या ‘रिच फील स्पा’वर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले. या कारवाईत वेश्यागमनासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. 

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली (प्रादेशिक विभाग), पोलीस उप-आयुक्त डॉ. शिवाजी पवार (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे (गुन्हे-१) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली शेंडगे,  सुनिल शिरसाट, भगवंता मुठे, गणेश कारोटे, श्रद्धा भरगुडे, वैष्णवी गावडे, निलम बुचडे, संगिता जाधव, उदयकुमार भोसले यांचा समावेश होता.

२०२६ मध्ये १७ पीडित महिलांची सुटका- 

 २०२६ मध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने एकूण आठ आस्थापनांवर छापे टाकले असून त्यात सहा मसाज पार्लर/स्पा आणि दोन हॉटेल्सचा समावेश आहे. या कारवाईत भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच १७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर अधिक तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

———————

बातमीसाठी संपर्क : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *