रत्नागिरीत पाटबंधारे विभागाचा ‘मोठा मासा’ गळाला; २ लाखांची लाच घेताना कार्यकारी अभियंता, लिपिक एसीबीच्या जाळ्यात

रत्नागिरी/ प्रतिनिधी

तक्रारदार यांचा ‘शिवकृपा कन्स्ट्रक्शन’ या नावाने बांधकाम व्यवसाय असून मंडणगड तालुक्यातील भोळवली परिसरातील धरण गळती रोखण्यासाठी मातीकामाचे कार्य रत्नागिरी पाटबंधारे विभागामार्फत त्यांना देण्यात आले होते. संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर दोन देयके अदा करण्यात आली; मात्र अंतिम देयकातून ११ लाख ३० हजार ८९३ रुपयांची रक्कम कपात करण्यात आली होती. ही कपात केलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी तक्रारदारांनी १८ मार्च रोजी कार्यकारी अभियंता गणेश हरीदास सलगर (वय ३६) यांची भेट घेतली. त्यावेळी कपात केलेली रक्कम मंजूर करण्यासाठी ३ लाख ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर तक्रारदारांनी २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. एसीबीने पंचांसमक्ष पडताळणी केली असता तडजोडीअंती दोन लाख रुपयांवर व्यवहार निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, मुख्य आरोपी गणेश सलगर यांनी लाचेची रक्कम कनिष्ठ लिपिक शेखर चंद्रमणी पवार (वय ३९) याच्याकडे देण्याचे निर्देश दिले. पवार याने ही रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले.

या प्रकरणात गणेश सलगर (वर्ग १ – कार्यकारी अभियंता) आणि शेखर पवार (वर्ग ३ – कनिष्ठ लिपिक टंकलेखक) यांच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि रत्नागिरी एसीबीचे उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव व त्यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *