मातोश्रीवरून अलिबाग–मुरुडच्या विकासाला नवी दिशा; उद्धव ठाकरे यांचे नगरसेवकांना मार्गदर्शन
पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत )
मुंबईतील मातोश्री येथे अलिबाग व मुरुड येथील नवनिर्वाचित नगरसेवकांची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत झालेली भेट उत्साह, आत्मविश्वास आणि नव्या उमेदीने भरलेली ठरली.
या बैठकीत स्थानिक पातळीवरील विकासकामांना वेग देणे, नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे आणि पारदर्शक, उत्तरदायी प्रशासन उभारणे यावर सखोल मंथन झाले. उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना “जनतेशी नाळ जपा, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या आणि विश्वासार्ह कामगिरीद्वारे शिवसेनेची ओळख अधिक मजबूत करा,” असे स्पष्ट मार्गदर्शन केले.

यावेळी विनायक राऊत, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर तसेच जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बळकटी, आगामी निवडणूक धोरणे आणि विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत ठोस दिशा ठरवण्यात आली.
पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, ही भेट केवळ औपचारिक न राहता अलिबाग व मुरुड शहरातील शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीसाठी एक निर्णायक टप्पा ठरणार आहे. नव्या नेतृत्वाच्या जोमाने आणि ठोस नियोजनाने येत्या काळात या भागात विकासाचा वेग अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
फोटो ओळ 1,मातोश्री येथे अलिबाग व मुरुड येथील नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत भेट घेतली. व मार्गदर्शन घेतले. (छाया :धम्मशील सावंत, पाली बेणसे )
