नगराध्यक्षा विजया पाटील यांचा घणाघात: तासगावच्या विकासाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न हास्यस्पद
संकेत पाटील /तासगाव
तासगाव शहराच्या वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आणि गेली अनेक दशके रखडलेल्या बायपास रस्त्याचा प्रश्न माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या अथक पाठपुराव्यामुळेच सुटला आहे. काकांनी विशेष बाब म्हणून अर्थसंकल्पात ८५ कोटी रुपयांची तरतूद केल्यानेच आज शेतकऱ्यांच्या हातात मोबदल्याचे धनादेश पडत आहेत, असे प्रतिपादन तासगावच्या नगराध्यक्षा विजया पाटील यांनी केले. तासगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी नगराध्यक्षांनी आमदार रोहित पाटील यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, “गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न रेंगाळला होता. राज्यात सर्वोच्च पदे भूषवणाऱ्या नेत्यांनाही हे जमले नाही, मात्र संजयकाकांनी ‘बजेट प्लॅन’ तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष भूसंपादनापर्यंत सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.”

संजयकाकांचा अथक पाठपुरावा:
85 कोटींचा निधी मंजूर करून आणण्यात संजयकाका पाटील यांचा सिंहाचा वाटा.
शेतकऱ्यांना दिलासा:
भूसंपादनाचे धनादेश थेट शेतकऱ्यांच्या हातात मिळाल्याने विकासाचा मार्ग मोकळा.
श्रेयवादाची सवय:
काम पूर्णत्वास आल्यावर श्रेय घेण्याची आमदार रोहित पाटलांना सवय लागल्याचा आरोप.
शहराची कोंडी फुटणार:
बायपासमुळे तासगावच्या विकासाला नवी गती मिळणार आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार.
आमदारांचा आव हास्यस्पद! “संजयकाकांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पातच हा निधी मंजूर करून आणला. आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर केवळ मिरजेच्या प्रांत कार्यालयात बैठक लावून ‘मीच हे केले’ असा आव आणणे हास्यस्पद आहे. मंजूर कामाचे श्रेय लाटण्याचा हा केविलवाणा प्रकार आहे.”
— विजया पाटील, नगराध्यक्षा

आमदार म्हणजे केवळ ‘पोस्टर बॉय’
संजयकाकांनी पाणी प्रश्न सोडवला किंवा नगरपालिकेची इमारत मंजूर केली, की लगेच डिजिटल फलक लावून पोस्टरबाजी करायची, एवढेच काम आमदार रोहित पाटील यांनी केले आहे. त्यांनी लोकांच्या संधीचे सोने करावे आणि ‘पोस्टर बॉय’ ही आपली प्रतिमा बदलून लोकहिताची ठोस कामे करावीत, असा टोलाही नगराध्यक्षांनी लगावला.
यावेळी तासगावच्या विकासातील मोठा अडथळा दूर केल्याबद्दल नगराध्यक्षा विजया पाटील, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या वतीने संजयकाका पाटील यांचे जाहीर आभार मानण्यात आले.
