हिंजवडी शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३ च्या कामाला वेग

पीएमआरडीए अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पाहणी; अडथळे दूर करण्याच्या सूचना

पिंपरी । प्रदीप लोखंडे

पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला वेग आणि सोय देणाऱ्या माण–हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष ‘ग्राउंड झिरो’वर उतरून पाहणी केली आहे. पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी प्रकल्पातील विविध महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देत कामाची सद्यस्थिती, अडचणी आणि प्रगती यांचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणीमुळे प्रकल्पातील अडथळे ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

पाहणीदरम्यान पीएमआर २१ या परिसरातील जागेचा प्रश्न प्राधान्याने हाताळण्यात आला. मेट्रो स्थानकासाठी आवश्यक असलेल्या जिन्याच्या बांधकामासाठी जागा तातडीने मोकळी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून देण्यात आले. या निर्णयामुळे या भागातील प्रलंबित कामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विद्यापीठ चौक परिसरात पाषाण रॅम्पजवळ पुणे महानगरपालिकेच्या जलवाहिनीतून होत असलेल्या पाणी गळतीचा मुद्दा देखील अधोरेखित झाला. ही गळती तात्काळ थांबवण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. पाणी गळतीमुळे कामात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोका टाळता यावा, यावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे.

बाणेर येथील पीएमआर १५ या ठिकाणीही मेट्रो जिन्याच्या जागेची पाहणी करण्यात आली. येथे सुरू असलेल्या बांधकामाची गुणवत्ता, कामाचा वेग आणि नियोजनाची अंमलबजावणी यांचा बारकाईने आढावा घेण्यात आला. कामात कोणतीही त्रुटी राहू नये आणि प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

एकूणच, मेट्रो लाईन-३ प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी पीएमआरडीए प्रशासनाने तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्यावर भर दिला आहे. पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असून, तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले. पाहणीवेळी पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

——————————

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल 

संपर्क : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *