पिंपरी-चिंचवड व मावळमध्ये पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक

तळेगाव एमआयडीसी व जुनी सांगवी येथे पोलिसांची कारवाई; देशी कट्टा, पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी । राईट अँगल 

पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्यात पोलिसांनी केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये देशी बनावटीची शस्त्रे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले आहे.

पहिल्या घटनेत तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी  ३० एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास वराळे-आंबी रोडवरील आशियाना सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत कारवाई केली. यामध्ये अनिल जगन जाधव (वय २६) याला अटक करण्यात आली. आरोपी हा तडीपार आदेश असतानाही परिसरात आढळून आला. त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

दुसऱ्या घटनेत सांगवी पोलिसांनी त्याच दिवशी पहाटे औंध जिल्हा हॉस्पिटलजवळील पॉवर हाऊस परिसर, जुनी सांगवी येथे कारवाई केली. या कारवाईत अर्थव सोपान मारणे (वय १९) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे ५१ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. संबंधित आरोपीवर मनाई आदेश असतानाही त्याने शस्त्र बाळगल्याचे निष्पन्न झाले.

दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. शहर व परिसरात बेकायदेशीर शस्त्रांविरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे.
———————-

प्रदीप लोखंडे, संपादक राईट अँगल 

संपर्क : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *