विधानपरिषद उमेदवारी पुणे, पिंपरी की ग्रामीण भागाला? इच्छुकांमध्ये उत्सुकता शिगेला
पिंपरी | प्रदीप लोखंडे
विधानपरिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील वरिष्ठ पातळीवरील चर्चेतून राष्ट्रवादीच्या बाजूने सकारात्मक संकेत मिळाल्याने पक्षातील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आता ही जागा पुणे शहराला, पिंपरी-चिंचवडला की ग्रामीण भागाला मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारीची घोषणा आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुतीतील जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर पुण्याची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याची चर्चा अधिक बळावली आहे. त्यामुळे इच्छुकांनी लॉबिंगला सुरुवात केली असून विविध स्तरावरून दबाव वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
पुणे शहरातून माजी आमदार सुनील टिंगरे हे प्रमुख इच्छुक मानले जात आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. तर पिंपरी-चिंचवडमधून माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक संदीप वाघेरे, अजित गव्हाणे, तसेच भाऊसाहेब भोईर हे इच्छुक आहेत. शहरातील संघटनात्मक ताकद, निवडणूक व्यवस्थापन आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव या निकषांवर त्यांची चर्चा सुरू आहे.

ग्रामीण भागातूनही अनेक नेत्यांनी दावा मजबूत केला आहे. खेडमधून माजी आमदार दिलीप मोहिते यांनी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे देखील शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शहर विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे शहर पदाधिकारी फझल शेख आणि माजी नगरसेवक गोरक्षनाथ लोखंडे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत पिंपरी-चिंचवडला राष्ट्रवादीचे दोन आमदार मिळावेत, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले. शहराची वाढती लोकसंख्या, पक्षाची ताकद आणि आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता पिंपरी-चिंचवडला प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने होतो, याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
——————————
प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल
संपर्क क्रमांक : 7350266967
