महापालिका कारवाई करणार का ? नागरिकांचे लक्ष ।
पिंपरी । राईट अँगल
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील सर्व्हे नंबर २६१ हा भूखंड नवीन विकास आराखड्यानुसार स्मशानभूमी व खेळाचे मैदान यासाठी आरक्षित आहे. तसेच हा भूखंड मुळा नदीपात्राच्या निळ्या पूररेषा व पूरप्रवण क्षेत्रात येत आहे. असे असताना याठिकाणी पेट्रोल पंप बांधण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. महापालिकेने ती नाकारली. मात्र, नगरविकास विभागाला शहरातील तीन आमदारांनी शिफारसपत्र देत याठिकाणी अनधिकृत पेट्रोलपंप उभारण्याचा घाट घातला असल्याचे समोर आले आहे.
विशालनगर ते वाकड या बायपास रस्त्याच्या कडेला मुळा नदीपात्राच्या लगत आरक्षित भूखंड आहे. याठिकाणी पूरप्रवण क्षेत्र देखील आहे. असे असताना या भूखंडावर पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मागण्यात आली. मात्र, निळ्या पूररेषेत येत असल्याने महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने परवानगी दिली नाही. मात्र, शहरातील आमदारांनी यामध्ये लक्ष घालत थेट नगरविकास विभागालाच याठिकाणी पेट्रोल पंप बांधण्यासाठी शिफारस पत्र दिले. सदर ठिकाणी नागरिकांना पेट्रोल पंपाची गरज असल्या कारणाने संबंधितांना तात्काळ कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात यावेत असे शिफारसपत्र दिले आहे. वाकड परिसरामध्ये दोन किलोमीटर अंतराच्या परिघामध्ये चार ते पाच पेट्रोल पंप असताना इथे मुलांच्या खेळाच्या मैदानासाठी राखीव जागेत आणि निळी पूररेषा असलेल्या भूखंडावर धोकादायक पाऊल उचलत कुणा एका व्यावसायिकाच्या हितासाठी पेट्रोलपंप सुरू करण्याचा घाट आमदारांनी का घातला आहे असा सवाल नागरिक करीत आहेत.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. पावसाळ्यात मुख्य नाल्याचे व मुळा नदीचे पाणी पेट्रोल पंप परिसरात शिरून संपूर्ण जागा तुडुंब भरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ज्वलनशील पदार्थांचा साठा असलेला पेट्रोल पंप नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करू शकतो, पर्यावरणाला हानिकारक ठरू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे.
–——————-
