सत्यवान उबाळे यांच्याकडे जबाबदारी ; ६० कोटींचा उपसूचना घोटाळा जैन यांना भोवला
पिंपरी । राईट अँगल
पिंपरी चिंचवड महापालिकेत ६० कोटी रुपयांच्या उपसूचना घोटाळा प्रकरणात अखेर राज्य शासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेले महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या जागी नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी सत्यवान किशनराव उबाळे यांची ‘वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने २९ मे २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.
महानगरपालिकेच्या मूळ अंदाजपत्रकात किंवा विकासकामांच्या नियोजनात ऐनवेळी कोट्यवधी रुपयांच्या उपसूचना घुसडून विशिष्ट कंत्राटदारांना आणि हितसंबंधियांना आर्थिक फायदा पोहोचवण्याचा डाव आखला गेला होता. हा संपूर्ण भ्रष्टाचार स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी अत्यंत आक्रमकपणे बाहेर काढला. प्रशासकीय मंजुरीचे कोणतेही ठोस निकष नसताना आणि आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध नसतानाही या ६० कोटींच्या फाईल्स नियमबाह्य पद्धतीने मंजुरीसाठी पुढे सरकवण्यात आल्याचे सभापती बारणे यांनी उघड केले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी या नात्याने प्रवीण जैन यांनी या नियमबाह्य कामाला आक्षेप घेणे अपेक्षित असताना, त्यांनी कंत्राटदारांच्या फायद्यासाठी या फाईल्स मंजूर करून घेण्यामध्ये मुख्य भूमिका बजावली. त्यावरून राज्य सरकार आणि वित्त मंत्रालयाकडे जैन यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली व त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली. मुख्यमंत्री आणि वित्त मंत्रालयाने जैन यांना पदावरून हटवण्याचा कठोर निर्णय घेतला.
नवी मुंबई महानगरपालिकेत मुख्य लेखा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सत्यवान किशनराव उबाळे यांची बदली आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा अधिकारी’ या अत्यंत महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे.
नगरसेवकांवर कारवाई होणार का ?
६० कोटींच्या घोटाळ्याला जबाबदार धरत प्रवीण जैन यांची बदली करण्यात आली. मात्र उपसूचनेवर सही करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्यात येणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नगरसेवकांवर गुन्हे दाखल होतील का हे पाहावे लागणार आहे.
—————-
