संकेत पाटील / तासगाव
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा धसका आता तासगावमधील भेसळखोरांनीही घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात FDA कडून सुरू असलेल्या गुप्त मोहिमेत काल सुमारे 1.5 लाख रुपयांचा भेसळयुक्त व नियमबाह्य मुद्देमाल विविध ठिकाणांवरून जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जप्त मुद्देमालात काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मुद्देमालात क्रीम, श्रीखंड, बासुंदी, खवा यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. सणासुदीच्या तोंडावर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या पदार्थांवर FDA ने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.
अवैध गुटखा विक्रेत्यांना बसला चाप
तासगाव शहरातच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या आणि चोरून-लपून अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांनाही FDA च्या धाडीचा मोठा दणका बसला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध गुटखा विक्री करणाऱ्या काही पानपट्ट्या देखील बंद झाल्याचे चित्र आहे.
याशिवाय ‘विदाऊट ब्रँडिंग’ आणि ‘विदाऊट मॅन्युफॅक्चरिंग’ पत्ता असलेले संशयास्पद ब्रँडदेखील तासगावच्या बाजारपेठेतून अचानक गायब झाले आहेत. FDA च्या भीतीने अनेकांनी आपला माल लपवल्याची चर्चा आहे.
कारवाई कुणावर? नावे गुलदस्त्यात
सध्या अन्नपदार्थ निर्मिती करणारे व्यावसायिक FDA च्या पहिल्या टप्प्यातील रडारवर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, काल झालेली अन्न भेसळ विभागाची कारवाई नेमकी कुणावर झाली याबाबतची माहिती अधिकृतपणे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
त्यामुळे शहरात याबाबत जोरदार तर्क-वितर्क लढवले जात असून, विविध नावांची चर्चा रंगली आहे. FDA कडून अधिकृत प्रेस नोट येईपर्यंत संभ्रम कायम आहे.
‘मुंढे इफेक्ट’ तासगावात
तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त झाल्यापासून हा विभाग राज्यभर चर्चेचा आणि दहशतीचा विषय ठरला आहे. त्यांच्या राज्यभरातील धडक कारवाया पाहता तासगावमधील भेसळ करणारेही आता चांगलेच धास्तावले आहेत.
दरम्यान, सर्वसामान्य जनतेकडून मुंढे यांच्या या कडक कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होत आहे. “अशीच कारवाई सुरू राहिली तरच भेसळीला आळा बसेल,” अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पुढे काय?
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही फक्त सुरुवात असून आगामी काळात तासगाव शहर आणि तालुक्यातील सर्व मिठाई दुकाने, हॉटेल्स आणि दूध डेअरींची देखील कसून तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
