तासगावात FDA च्या नाकाखाली गुटख्याची उघड विक्री, ‘होम डिलिव्हरी’ आणि ‘इन्फॉर्मर’मुळे धाडी फसतात का?

गायब झालेला गुटखा पुन्हा बाजारात

गेल्या महिन्यात FDA च्या कारवाईच्या भीतीने तासगावातील पानपट्ट्यांवरून गुटखा एकदम गायब झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा बंदी असलेला पदार्थ पुन्हा सहज उपलब्ध होऊ लागला आहे. विशेष म्हणजे पानपट्टीवाले “आम्ही गुटखा विकत नाही” असे सांगत असले, तरी नागरिकांना तो मिळतो तरी कुठून? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

फ्लिपकार्ट -अमेझॉन’ स्टाईल होम डिलिव्हरी

गुटखा विक्रीची पद्धत आता अधिक आधुनिक झाली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, काही विक्रेते फोन केल्यावर ग्राहकाला पाहिजे त्या ठिकाणी घरपोच गुटखा पोहोचवत आहेत. अगदी फ्लिपकार्ट-अमेझॉन सारखीच ही ‘सेवा’ सुरू असल्याने धक्का बसला आहे. यामुळे विक्रीला कोणताही पुरावा सापडत नाही आणि कारवाई टाळता येते.

‘इन्फॉर्मर’च्या मदतीने धाडी टाळण्याचा डाव

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, FDA चे अधिकारी तासगावात कधी येतात याची माहिती देण्यासाठी काही लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
“FDA ची गाडी तासगावच्या दिशेने वळली की लगेचच ही माहिती पानपट्टीवाल्यांना कळवली जाते.”
त्यानंतर पानपट्टीवाले दुकानातील सर्व गुटख्याचा माल पिशवीत भरून दुकानाबाहेर लांब एखाद्या मुलाकडे ठेवतात. आणि तिथूनच गुपचूप पिशवीतून विक्री केली जाते.

शहरात दबून, ग्रामीण भागात बिनधास्त विक्री

शहरातील काही पानपट्ट्यांवर गुटखा थोडा दबून विकला जात असला, तरी तासगावच्या ग्रामीण भागात मात्र गुटखा विक्रेत्यांना कोणतीही भीती नसल्याचे चित्र आहे. तेथे उघडपणे आणि मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत असल्याचे नागरिक सांगतात. ग्रामीण भागात तपासणी कमी असल्याचा याचा फायदा घेतला जात आहे.

FDA ने इकडे लक्ष देणे गरजेचे

राज्यभरात FDA ची एवढी धास्ती असताना तासगावात मात्र गुटखा सर्रास मिळत असल्याने “FDA ला तासगावातील पानपट्ट्यांची भीती आहे का?” असा प्रश्न यनिमित्ताने उपस्थित होतो आहे. त्यामुळे त्यांनी इकडे लक्ष द्यावे ही सामान्य नागरिकांची मागणी आहे.

नागरिकांची मागणी
*•तासगावात अचानक आणि गुप्तपणे धाडी टाकून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.

•माहिती लीक करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा.

•फोनवरून ऑर्डर घेऊन विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी.

•शहराबरोबरच ग्रामीण भागातही नियमित तपासणी मोहीम राबवावी.

बंदी असूनही गुटखा मिळत असल्याने आरोग्याला धोका तर आहेच, शिवाय कायद्याची पायमल्लीही होत आहे. यावर FDA आणि स्थानिक प्रशासन काय पाऊल उचलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *