स्वच्छ तासगाव, सुंदर तासगाव म्हणणाऱ्या पाटीखालीच गेले 3 दिवस महिलांचे स्वच्छतागृह कुलूपबंद!

तिकीटात स्वच्छता कर घेता, मग महिलांचे शौचालय बंद का? तासगाव एसटी स्थानकात 3 दिवसांपासून महिलांची कुचंबना

संकेत पाटील /तासगाव

नेमका प्रकार काय?
पूर्वी या स्वच्छतागृहाचा ठेका खाजगी संस्थेला दिला जात होता. पण आता काही महिन्यांपासून प्रत्येक एसटी तिकीटामागे प्रवाशांकडून ‘स्वच्छता कर’ म्हणून ठराविक रक्कम वसूल केली जाते. त्यामुळे ठेका रद्द करून हे शौचालय आता थेट एसटी महामंडळ चालवत असल्याच समजतं आहे. प्रवाशांकडून पैसे घेऊनही सेवा बंद असल्याने ही सरळ सरळ प्रवाशांची लूट आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

महिलांनी जायचे कुठे?
तासगाव बसस्थानक हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातून हजारो महिला उपचार, शिक्षण, बाजारासाठी येतात. बसची वाट पाहताना नैसर्गिक विधीसाठी जायचे कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. तीच पुरुषांच्या प्रसाधनगृहाची अवस्था आहे, हे दोन्ही प्रसाधन गृह बंद ठेवण्यामागे नेमके कारण काय?

जबाबदार कोण?
या प्रकाराची जबाबदारी कुणाची? स्थानक प्रमुखाची, स्वच्छता विभागाची की वरिष्ठ अधिकाऱ्यांची? तीन दिवस झाले तरी कुलूप उघडले जात नाही, याचा अर्थ प्रशासन झोपले आहे का?

यनिमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात.

१. तिकीटात स्वच्छता कर घेऊनही शौचालय बंद का आहे?
२. महिला स्वच्छतागृहाच्या देखभालीसाठी नेमलेला कर्मचारी कुठे आहे?
३. महिलांची कुचंबना होत असताना स्थानक प्रमुखाने आतापर्यंत काय कारवाई केली?
४. स्वच्छ तासगावच्या नावाखाली हा अस्वच्छ कारभार आहे का?
५. हे शौचालय तात्काळ सुरू न झाल्यास महिला संघटना आंदोलन करतील, याची जबाबदारी घेणार कोण?

दरम्यान, हे स्वच्छतागृह तात्काळ सुरू करावे, अशी मागणी महिला प्रवाशांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *