अखेर तासगावात वरूणराजा बरसला ;शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदअश्रू, खरीप वाचवणारा पाऊस

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तासगाव तालुक्यातील खरीप पिकांची अवस्था बिकट झाली होती. धुके आणि त्यानंतर पडणाऱ्या कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला होता. परिणामी हायब्रीड, भुईमूग, मका, ज्वारीसह अन्य पिकेही माना टाकू लागली होती. काही ठिकाणी पिके करपून वाळण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली होती. अशा परिस्थितीत रविवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून तालुक्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने खरिपाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

अखेर तासगावात वरूणराजा बरसला ;शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदअश्रू, खरीप वाचवणारा पाऊस

संकेत पाटील /तासगाव

तालुक्यातील डोंगरसोनी, लोढे, सावर्डे, मणेराजुरी, चिंचणी यासह अन्य गावांमध्ये सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. काही भागांत जोरदार सरी बरसल्याने शेतजमिनीत पुन्हा ओलावा निर्माण झाला. पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली होती. जमिनीतील ओलावा संपल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. विहिरी, कूपनलिका आणि बोअरमधील पाण्याची पातळीही खाली गेल्याने अनेक भागांत सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. खरीप पिके हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती.

रविवारी झालेल्या पावसामुळे अंतिम घटका मोजणाऱ्या खरीप पिकांना मोठा आधार मिळाला आहे. विशेषतः मका, ज्वारी, भुईमूग आणि हायब्रीड पिकांसाठी हा पाऊस महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, पावसाचे प्रमाण गावागावानुसार वेगवेगळे असल्याने सर्वच भागातील पिकांना समान लाभ मिळेलच असे नाही. आगामी काही दिवसांत पुन्हा पाऊस झाला तर खरीप पिकांना चांगले पुनरुज्जीवन मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

निसर्गाकडे लागले होते डोळे

पावसाअभावी शेतकरी अक्षरशः आभाळाकडे डोळे लावून बसला होता. हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. रविवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेची पालवी फुटली आहे. आता पुढील काही दिवस पावसाची साथ मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत