पनवेल :
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यातील १० शिक्षकांची ‘उपक्रमशील शिक्षक’ म्हणून निवड करण्यात आली आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या शिफारशीनुसार ही निवड झाली आहे.
निवड झालेल्या शिक्षकांमध्ये – अपर्णा गुंड (देहरंग, वाजे केंद्र), सुप्रिया गोरे (कोळखे, काळुंद्रे केंद्र), वैशाली म्हात्रे (भेरले, पोयंजे केंद्र), प्रणिता सारदळ (खारघर, कळंबोली केंद्र), निळकंठ भुरे (जांभिवली वाडी, वावेघर केंद्र), साधना पाटील (वहाळ, वहाळ केंद्र), विद्या म्हात्रे (करंजाडे, चिंचपाडा केंद्र), नरेश विठ्ठल पाटील (इयत्ता तिसरी, पारगाव शाळा, ओवळा केंद्र), निशा चांगदेव म्हात्रे (भिंगारी, काळुंद्रे केंद्र) आणि वैशाली दामोदर काकडे (कोयनावेळे, नावडे केंद्र) यांचा समावेश आहे.
गट अध्ययन पद्धतीवर भर
या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत विविध उपक्रमांचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. गट अध्ययन पद्धतीसोबत गणित पेटी आणि भाषा पेटी या शैक्षणिक साहित्याचा वापर करण्याचे नियोजन आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी माता पालक गट यांसारख्या उपक्रमांचाही वापर करण्यात येणार आहे.
नव्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती
शिक्षकांनी अध्यापन अधिक प्रभावी आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी नवनवीन शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्यावरही भर देण्यात आला आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती, गटकार्य आणि शैक्षणिक साहित्याच्या वापरातून शिकण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
१० दिवसांत व्हिडीओ पाठवण्याच्या सूचना
निवड झालेल्या सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे व्हिडीओ तयार करून येत्या १० दिवसांत पनवेल तालुक्याच्या समन्वयक रूपाली पाटील यांच्याकडे पाठवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमातून शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचे दस्तऐवजीकरण होण्याबरोबरच इतर शिक्षकांनाही अशा शैक्षणिक प्रयोगांची माहिती मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा