येरळा नदीचे पाणी अडवा, अन्यथा कृष्णेत वाहून जाणार; निमणीच्या सरपंचांचा जलसंपदा विभागाला इशारा

गेल्या काही दिवसात माण-खटाव परिसरात झालेल्या पावसामुळे येरळा नदी पात्रात पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. मात्र हे वाहते पाणी जागोजागी न अडवल्यामुळे थेट कृष्णा नदीत जाऊन मिसळत असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

येरळा नदीचे पाणी अडवा, अन्यथा कृष्णेत वाहून जाणार; निमणीच्या सरपंचांचा जलसंपदा विभागाला इशारा

संकेत पाटील /तासगाव:

अल निनोच्या प्रभावामुळे भविष्यात पावसाची शाश्वती नसताना हे वाहणारे पाणी अडविणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. सध्या पाण्याचा थोडा प्रवाह सुरू असून निमणी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये पाणी अडविल्यास त्याचा मोठा फायदा येरळा काठच्या शेतकऱ्यांना तसेच पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर निमणी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रेखा रविंद्र पाटील यांनी तासगाव उपविभागाच्या सहाय्यक अभियंता, कृष्णा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, “सध्या येरळा नदी पात्रात गेल्या काही दिवसापासून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. येरळा नदी काठच्या शेतकऱ्यांच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी व भविष्यात पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी येरळा नदी पात्रात वाहणारे पाणी अडविणे गरजेचे आहे. निमणी पात्रातील दोन बंधारे भरल्यास शेतकऱ्यांना तसेच पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे. तरी आपण या बंधाऱ्यात पाणी अडविण्याची तातडीने व्यवस्था करावी.”

प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह:
एकीकडे 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर होत असताना, दुसरीकडे आलेलं पाणीही अडवले जात नसेल तर दुष्काळाशी लढायचं कसं, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. जलसंपदा विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी येरळा काठच्या शेतकऱ्यांमधून होत आहे.

Dam News Maharashtra, Irrigation Department, Krishna River, Maharashtra Irrigation, Maharashtra News, Maharashtra Water Issue, Marathi News, Nimni Sarpanch, Nimni Village, Right Angle Marathi, River Water Management, Sangli Ground Report, Sangli News, Tasgaon News, Water Conservation, Water Scarcity Maharashtra, Yerala Krishna River Link, Yerala River, Yerala River News, Yerala River Water

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत